बेळगाव विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या 7 जिल्ह्यातील सहाय्यक सरकारी वकिलांची 38 रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरली जाणार असून तसा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला आहे.
बेळगाव जिल्ह्यात विविध कारणास्तव 13 सहाय्यक सरकारी वकिलांची पदे रिक्त आहेत. या पद्धतीने बेळगावसह राज्यात एकूण 205 सहाय्यक सरकारी वकिलांची पदे रिक्त असून त्यासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. बेळगाव येथील सहाय्यक सरकारी वकिलांची पदे भरून घेण्यासाठी जिल्हा समिती स्थापण्यात आली होती. या समितीतर्फे अर्जांसाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद मिळाला असून बेळगावसह विभागातील 7 जिल्ह्यातील 38 पदे भरली जाणार आहेत. याबाबत शासनाला प्रस्ताव पाठविण्यात आला असून पुढील महिन्यात निवड यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. सरकारी वकिलांची कायमस्वरूपी पदे भरल्यानंतर कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या वकिलांना सेवेतून मुक्त केले जाणार आहे. बेळगाव विभागातील हुक्केरी तालुक्यात 1 पद, खानापूर 2, रामदुर्ग 2, चिकोडी 1, रायबाग 2, अथणी 4 आणि निपाणी येथे 1 अशी एकूण 13 सहाय्यक सरकारी वकिलांची पदे रिक्त आहेत.
सहाय्यक सरकारी वकिलांच्या रिक्त पदांमुळे न्यायालयीन कामकाजावर परिणाम होत आहे. शिवाय एका सरकारी वकिलावर सध्या तीन ते चार न्यायालयांची अतिरिक्त जबाबदारी आहे. परिणामी दाव्यांचा सखोल अभ्यास करणे, युक्तिवाद करणे, सुनावणीला उपस्थित राहणे आदी बाबींवर मर्यादा येत आहेत. त्यामुळे वादी व प्रतिवादी यांना न्यायदान देण्यास विलंब होत असल्याच्या तक्रारी वाढल्यामुळे सदर भरती प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे.
____________
(*** एखादा न्यायालयाचा फोटो वापरणे)