छत्रपती शिवाजी क्रीडा कुस्ती संघटना पिरनवाडीतर्फे उद्या रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2020 रोजी दुपारी 4 वाजता आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे. इराणचा वर्ल्ड चॅम्पियन पै. उमर अली हा या कुस्ती मैदानाचे मुख्य आकर्षण असणार आहे.
हजरत शहा सद्रोद्दिन अन्सारी उर्फ जंगली पीर उरुसानिमित्त नवीन ग्रामपंचायत जनता प्लॉट पिरनवाडी येथे हे जंगी कुस्ती मैदान आयोजित केले जाणार आहे. या कुस्ती मैदानातील प्रथम क्रमांकाची कुस्ती इराणचा वर्ल्ड चॅम्पियन पै. उमर अली आणि दिल्लीचा हिंदकेसरी पै. नवीन मोरे यांच्यात होणार आहे. याखेरीज महान भारत केसरी सिकंदर शेख (सेनादल), भारत केसरी प्रदीप जीरकपुर (चंदिगड), डबल कर्नाटक केसरी कार्तिक काटे (दावनगेरी), महाराष्ट्र चॅम्पियन प्रकाश बनकर (कोल्हापूर), अभिजीत कणेकर आदींसह कर्नाटक, महाराष्ट्र, पंजाब आणि दिल्ली येथील मातब्बर पहिलवान या कुस्ती मैदानात भाग घेणार आहेत. त्याचप्रमाणे सदर जंगी कुस्ती मैदानामध्ये लहान – मोठ्या एकूण 54 कुस्त्या होणार आहेत.
शनिवारी कुस्ती कमिटीने जनता प्लॉट मधील नूतन कुस्ती आखड्याची पहाणी केली.जनता प्लॉट मध्ये नवीन आखाडा बनवण्यात आला आहे.
यावेळी आखाडा समारंभाचे अध्यक्षस्थान आप्पाजी मुचंडीकर हे भूषविणार असून ग्रा. पं. अध्यक्ष राकेश तळवार आणि शिवसेना तालुकाप्रमुख सचिन गोरले यांच्या हस्ते हे हनुमान फोटो पूजन होणार आहे. त्याचप्रमाणे एपीएमसीचे माजी अध्यक्ष यशवंत नेसरकर हे छ. शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करतील. त्यानंतर आखाड्याचे उद्घाटन माजी आमदार गुरुवर्य परशुरामभाऊ नंदिहळ्ळी यांच्या हस्ते होणार असून आखाड्याचे पूजन पिरनवाडी पंचमंडळींच्या हस्ते होईल.
छत्रपती शिवाजी क्रीडा कुस्ती संघटना पिरनवाडीचे सचिन गोरले, शिवाजी शहापूरकर, राकेश तळवार, मल्लाप्पा उचगांवकर, महावीर पाटील, हिराचंद पाटील, संभाजी पाटील, प्रवीण मनोळकर, श्रीकांत पाटील, अन्सारी हुबळीवाले, शिवानंद पाटील, सबॅस्टीन फुर्तादो, लतीफ मुजावर, इमतियाज मुजावर, आप्पुजी पाटील, नंदकुमार मुचंडीकर व त्यांचे सहकारी रविवारचे आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचे जंगी मैदान यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेत आहेत. जनता प्लॉट येथे जाणकार मंडळींच्या मार्गदर्शनाखाली कुस्ती आखाडा तयार करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे कुस्ती मैदानासाठीची आवश्यक ती सर्व पूर्वतयारी केली जात आहे.