लेखन ही कोणा एकाची मक्तेदारी नाही. सर्वसामान्य माणूस सुद्धा उत्तम लेखन करू शकतो, मात्र लेखन सकस होण्यासाठी प्रथम उत्तम वाचन असले पाहिजे. उत्तम साहित्याचे श्रवण सुध्दा केले पाहिजे. प्रारंभी अनुकरण करण्याचा धोका असू शकतो, परंतु नंतर तो बाजूला पडून आपली स्वतंत्र लेखन शैली फुलू शकते, असे मत बेळगावच्या साहित्यिका प्रा. माधुरी शानभाग यांनी व्यक्त केले.
मंथन कल्चरल अॅण्ड सोशल वेल्फेअर सोसायटीतर्फे 33 वे मंथन महिला साहित्य संमेलन रविवारी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत वरेरकर नाट्यसंघाच्या सभागृहात उत्साहात पार पडले. संमेलनाचा अध्यक्षस्थानावरून माधुरी शानभाग बोलत होत्या. व्यासपीठावर मंथन संस्थेच्या विद्यमान अध्यक्ष संपदा जोशी कार्यवाह मौसमी भातकांडे, ऐश्वर्या मुतालिक- देसाई, उपाध्यक्ष सुनिता पाटणकर, खजिनदार राही कुलकर्णी उपस्थित होत्या.
‘लेखनाचे मर्म’ या विषयावर माधुरी शानभाग यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सविस्तर विवेचन केले. त्या म्हणाल्या, लेखन उत्तम होण्यासाठी वाचन आणि अभिव्यक्ती जितकी महत्त्वाची आहे तितकेच कथाबीज फुलवणे महत्त्वाचे आहे. लेखन करण्याचे विविध प्रकार आहेत, मात्र लेखनाची खरी सुरुवात शालेयदशेत निबंध लेखनाने होते. हेच निबंध लेखन वाढवले तर स्फुट म्हणून आपण त्याचा विचार करू शकतो. वृत्तपत्रातील लेखन हे पुन्हा वेगळे असते तेथे कमी शब्दात नेमकेपणा आणि आशय अभिव्यक्त होणे गरजेचे आहे. मात्र प्रतिभा असेल तरच लेखक होता येते असे मात्र नाही. सर्वसामान्यही लेखन करू शकतात त्यासाठी लेखनाचे तंत्र आणि प्रकार मात्र लक्षात घेणे आवश्यक आहे. कथा म्हणजे निवेदन होणे, कथेमध्ये संवाद असले पाहिजेत. कथासूत्र महत्त्वाचे कोणतीही कथा अनेक अंगाने फुलू शकते तशी पुरवण्याची क्षमता वाचनानेच येऊ शकते. त्यासाठी सातत्याने लेखन करत राहणे महत्त्वाचे, असे प्रा शानभाग म्हणाल्या.
प्रारंभी दुसऱ्या साहित्यिकांचे अनुकरण सुद्धा आपल्याकडून होऊ शकते, मात्र ठराविक टप्प्यावर ते बाजूला पडून शैलीदार लेखनाची वाट आपल्याला मिळू शकते. अर्थात या सर्वासाठी उत्तम वाचन आवश्यक आहे, असे सांगून वाचा आणि लिहित्या व्हा, असे आवाहनही त्यांनी केले. माधुरी शानभाग यांनी पाॅवर पॉइंटच्या आधारे आपला विषय अधिकृतपणे समजावून दिला. काहीवेळा लेखन केले परंतु दुसऱ्या लेखकाची ती कथा आहे असे जाणवल्याने लेखन बाजूला राहिले. लेखन बाजूला केले परंतु दोन वर्षानंतर एका वेगळ्याच तंत्राने ती कथा पुढे आली आणि बक्षीस पात्र ही ठरली, असे त्यांनी नमूद केले.
दुसऱ्या सत्रात ‘सामाजिक भान’ या विषयावर किशोर काकडे आणि ‘शिक्षणाकडे पाहण्याचा बदलता दृष्टिकोन’ या विषयावर अनिरुद्ध खोसे यांनी आपले विचार व्यक्त केले.
तिसऱ्या सत्रात कवयित्रींचे कविता संमेलन झाले. त्यानंतर तेजस्विनी सोनसळे व योगिता पंचवटी यांनी नाट्याविष्कार सादर केला. संमेलनानिमित्त घेण्यात आलेल्या कथांचे कथाकथन विजेत्या स्पर्धकांनी केले. पहिल्या सत्राचे सूत्रसंचालन सुरेखा भावे यांनी केले, तर दुसऱ्या व तिसऱ्या सत्राचे सूत्रसंचालन अनुक्रमे शोभा लोकूर आणि संजना सामंत यांनी केले. मीना जठार यांनी आभार मानले. सदर मंथन महिला साहित्य संमेलनास निमंत्रितांना सह बहुसंख्य महिला उपस्थित होत्या. चंद्रज्योती देसाई यांच्या राष्ट्रगीत सादरीकरणानंतर संमेलनाची सांगता झाली.