श्री कपिलेश्वर महादेव विश्वस्त मंडळ, बेळगाव यांच्यावतीने दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिर आवारात उभारण्यात आलेल्या नूतन सभागृहाचा उदघाटन सोहळा उद्या मंगळवार दिनांक 18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता आयोजिण्यात आला आहे.
केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश अंगडी आणि चिक्क मंगळूर येथील दत्तपिठाचे पिठाधिश अशोक शर्मा गुरुजी यांच्या हस्ते सभागृहाचे उदघाटन करण्यात येणार आहे, अशी माहिती विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी राजू भातकांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या सभागृहात व्यासपीठाच्या मध्यभागी नवनाथ महाराजांच्या प्रतिमा असणारे प्लास्टर ऑफ पॅरिस पासून निर्माण केलेले थ्री डी स्वरूपातील पॅनल उभारण्यात आलेले आहे. याशिवाय श्री शिवशंकरच्या जीवनचरित्रातील गंगावतार, अमृतमंथन, त्रिपुरासुराचा वध, गोकर्ण आत्मलिंग, पार्वतीदेवी सती प्रसंग, कैलास पर्वत गर्वारोहन असे काही प्रसंग सादर करणाऱ्या पॅनल ( भित्तिमूर्ती ) सभागृहात साकारण्यात आल्या आहेत. लांजा-रत्नागिरी येथील कलाकार संदीप यांनी या भित्तिमूर्ती घडविल्या आहेत. अशा या आकर्षक सभागृहासाठी सुमारे दीड कोटी रुपयांचा खर्च आला आहे, असेही भातकांडे यांनी सांगितले आहे.
यावेळी बोलताना मंडळाचे अध्यक्ष सुनील बाळेकुंद्री म्हणाले, हे सभागृह चार इमल्यांचे राहणार आहे. सध्या पहिला मजला उभारण्यात आलेला असून एकूण खर्च अडीच कोटीपर्यंत अपेक्षित आहे. हा खर्च दानशूर व्यक्तींनी दिलेल्या देणगीतून उभारला जात आहे. सध्या बांधण्यात आलेल्या सभागृहात शिवलीला प्रसंगांचे पॅनल उभारण्यात आले असून या सभागृहाच्या उदघाटन सोहळ्यानंतर पॅनलसाठी देणगी दिलेल्या देणगीदारांचा सत्कार करून देणगीदारांच्या हस्ते पॅनल चे उदघाटन केले जाणार आहे.
विश्वस्त अभिजित चव्हाण म्हणाले, चार मजल्याच्या या सभागृहातील तळ मजला भजन, कीर्तन- प्रवचन कार्यक्रम, ध्यानधारणा, नामस्मरण आदीसाठी उपयोगात आणला जाणार आहे. दुसऱ्या मजल्यावर वैदिक पाठशाळा, सप्तऋषी माहिती संग्रहालय आणि विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, तिसऱ्या मजल्यावर परगावाहून सैन्य भरतीसाठी येणाऱ्याकरिता राहण्याची सोय तर चौथ्या मजल्यावर मंदिरातील निर्माल्यापासून खत निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी मंदिरात महाशिवरात्री सोहळा साजरा केला जाणार असून यासाठी मंदिर सजविण्यात येणार आहे. यासाठी विद्युत रोषणाईने काम विनोद पालकर (विनायक डेकोरेटर) यांनी हाती घेतले आहे. शनिवार दिनांक 22 रोजी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. यंदाचे हे महाप्रसादाचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. भाविकांनी कार्यक्रम आणि महाप्रसादाचा लाभ मोठ्या संख्येने घ्यावा, असे यावेळी बोलताना राकेश कलघटगी म्हणाले.