गेली तीन वर्षे चर्चेत असलेल्या गांधीनगर येथील जय किसान भाजी मार्केटच्या बांधकामाला बेळगाव महानगरपालिकेने अखेर परवाना दिला असून त्यामुळे भाजी व्यापाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. तथापि या बांधकाम परवान्याच्याविरोधात न्यायालयातून पुन्हा स्थगिती आणली जाऊ नये यासाठी कॅव्हेट दाखल करण्यात आले आहे.
जय किसान भाजीमार्केटतर्फे दिवाकर पाटील व के. के. बागवान यांनी बेळगाव जिल्हा होलसेल भाजी मार्केट संघटनेचे अध्यक्ष गजानन शहापूरकर आणि कार्यवाह सदानंद पाटील यांच्या विरोधात कॅव्हेट दाखल केले आहे. गांधीनगर येथील भाजी मार्केटच्या बांधकाम परवान्याचा विषय गेली तीन वर्षे सातत्याने चर्चेत आहे. आठ महिन्यापूर्वी किल्ला येथील जय किसान भाजी मार्केट एपीएमसी येथे स्थलांतरित करण्यात आले. त्यावेळी या भाजी मार्केटमधील व्यापाऱ्यांनी आंदोलन केले होते. तसेच एपीएमसी मार्केट शहराबाहेर लांब पडत असल्यामुळे तेथे जाण्यास जय किसान भाजी मार्केटच्या पदाधिकाऱ्याने नकारही दिला होता. मात्र तत्कालीन जिल्हाधिकारी आर. विशाल यांच्या आदेशानुसार पोलीस बंदोबस्तात भाजी मार्केटचे स्थलांतर झाले.
दरम्यान, गांधीनगर येथील अर्धवट अवस्थेत असलेल्या भाजी मार्केटच्या इमारतीच्या बांधकामाला परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली होती. तथापि महापालिकेने दोन वेळा बांधकाम परवाना अर्ज फेटाळला होता. अखेर दोन महिन्यापूर्वी महापालिकेचे तत्कालीन प्रशासक आमलान बिश्वास यांनी महापालिकेला पत्र पाठवून बांधकाम परवाना देण्याची सूचना केली होती.
त्यानंतर पुन्हा महापालिकेने जय किसान भाजीमार्केटला पत्र पाठवून अर्ज करण्यास सांगितले होते. आता बांधकाम परवाना देण्यात आल्यामुळे भाजी व्यापाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. आता खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्याकडून कॅव्हेट दाखल करण्यात आले आहे. जय किसान भाजीमार्केट प्रकरणी बेळगाव लाईव्हने सातत्याने व्यापाऱ्यांची बाजू लावून धरली होती.