बेळगावातील एकेपी फेरो कास्ट प्रा. लि. या कंपनीला देशातील सर्वात जलद उद्योगांच्या ‘इंडियाज ग्रोथ चॅम्पियन्स – 2020’ यादीमध्ये मानांकन मिळाले असून फाउंड्री सेक्टरमधील ही एकच कंपनी या मानांकनात आहे. इकॉनोमिक टाइम्स आणि ऑस्ट्रिया येथील स्टॅटीस्टा कंपनीने यासंबंधी नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणानुसार भारतातील 150 कंपनीच्या यादीत एकेपी फेरो कास्टला 111 वे मानांकन मिळाले आहे.
इकोनॉमिक टाइम्सने गेल्या नोव्हेंबर 2019 मध्ये भारतातील सुमारे 30 हजार कंपन्यांची माहिती गोळा केली होती. गेल्या 2015 ते 2018 या सालात कंपनीचा झालेला विकास, आयात-निर्यात, मालाचा दर्जा, महसुलातील वाढ आदींच्या अभ्यासाअंती 30 हजार कंपन्यांमधून 150 कंपन्यांची निवड करण्यात आली. त्यामध्ये वाघवडे रोड, मच्छे येथील एकेपी फेरो कास्ट कंपनीला 111 वे मानांकन मिळाले. यासंबंधीची यादी गेल्या 30 जानेवारी 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
एकेपी ग्रुप ऑफ कंपनीजची स्थापना 1978 मध्ये झाली, त्याचप्रमाणे एकेपी फेरो कास्ट प्रा. लि.ची स्थापना 2009 मध्ये झाली आहे. पराग भंडारे हे एकेरी फेरो कास्ट प्रायव्हेट लिमिटेडचे कार्यकारी संचालक आणि एकेपी फाउंड्री प्रायव्हेट लिमिटेडचे संयुक्त संचालक आहेत. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी गौतम भंडारे हे आहेत. आपल्या कंपनीने 2015 ते 2018 या कालावधीत राबविलेल्या विविध उपक्रमांचा अभ्यास करून ‘इंडियाज ग्रोथ चॅम्पियन्स – 2020’ या यादीत आपल्याला मानांकन देण्यात आले असल्याचे पराग भंडारे यांनी सांगितले
एकेपीकंपनीकडून मशिनरींचे सुटे भाग ऑटोमोबाईलमधील सुटे भाग, कॉम्प्रेसर, रेल्वेचे सुटे भाग बनवले जातात. या उत्पादनांपैकी 70 टक्के उत्पादनांचा देशांतर्गत खप होतो तर 30 टक्के उत्पादन निर्यात केले जाते. त्याचप्रमाणे उच्च प्रतीचे डक्टाईल आणि ग्रे आयर्न कास्टिंग यांच्या विक्रीमध्ये एकेपी फाउंडरी बाजारपेठे अग्रभागी आहे. बेळगावमध्ये सदर कंपनीच्या चार युनिट असून दोन फाउंड्री आणि तीन मशीन शॉप आहेत. या कंपनीला यापूर्वी दिल्लीच्या जेसीबी मशिनरीकडून ‘बेस्ट सप्लायर अवॉर्ड’ तसेच चेन्नई येथील कॅटर पीलरकडून ‘बेस्ट सप्लायर कॉलिटी’ अवॉर्ड मिळालेला आहे.