बेळगावची उदयोन्मुख जलतरणपटू आणि केएलएस स्कूलची विद्यार्थिनी इमानी जाधव हिने इचलकरंजी येथे झालेल्या पहिल्या आंतर राज्य जलतरण स्पर्धेची जनरल चॅम्पियनशिप पटकावली असून दक्षिण विभागीय जलतरण स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली आहे.
इचलकरंजी येथे गेल्या 1 व 2 फेब्रुवारी 2020 रोजी झालेल्या पहिल्या आंतरराज्य जलतरण स्पर्धेत इमानी जाधव हिने 100 मी. बॅकस्ट्रोक, 100 मी. बटरफ्लाय स्ट्रोक, 100 मी. फ्रीस्टाईल व 50 मी. फ्रीस्टाईल प्रकारात सुवर्णपदक आणि 200 मी. इंडिव्हिज्युअल मिडले प्रकारात रौप्यपदक हस्तगत केले. परिणामी सर्वाधिक 23 गुणांसह तिने या स्पर्धेचे सर्वसाधारण अजिंक्यपद अर्थात जनरल चॅम्पियनशिप मिळविली.
तत्पूर्वी मंड्या येथे झालेल्या 14 वर्षाखालील राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत इमानी जाधव हिने 200 मी. बॅकस्ट्रोक प्रकारांमध्ये रौप्यपदक मिळवल्यामुळे तिची दक्षिण विभागीय जलतरण स्पर्धेसाठी कर्नाटक संघात निवड झाली. तेलंगणा हैदराबाद येथे गेल्या 5 जानेवारी 2020 रोजी झालेल्या या स्पर्धेत कर्नाटकचे प्रतिनिधित्व करताना इमानीने 200 मी. बॅकस्ट्रोकमध्ये कांस्य पदक पटकाविले. त्याचप्रमाणे बेळगाव स्विमरस क्लबतर्फे गेल्या 25 व 26 जानेवारी रोजी आयोजित निमंत्रितांच्या जलतरण स्पर्धेत दोन सुवर्ण पदक, एक रौप्य व एक कांस्य पदक मिळविले.
या स्पर्धेत कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील जलतरणपटूंचा सहभाग होता. हिमानी जाधव हिने 50 मी. बॅकस्ट्रोकमध्ये प्रथम क्रमांक, 50 मी. मिक्स फ्री स्टाइल रिलेमध्ये प्रथम क्रमांक, 50 मी. फ्रीस्टाइल रिलेमध्ये द्वितीय आणि 50 मी. मिडले रिलेमध्ये तृतीय क्रमांक मिळविला.
केएलएस स्कूलमध्ये इयत्ता 8 वी मध्ये शिकणारी इमानी जाधव ही बेळगावची उदयोन्मुख होतकरू जलतरणपटू असून अनेक राष्ट्रीत स्पर्धात तिने पदके मिळवली आहेत. उपरोक्त यशाबद्दल तिचे शाळेमध्ये तसेच सर्वत्र अभिनंदन होत आहे.