पेशवाईच्या पार्श्वभूमीवरील राजकारणावर भाष्य करणारे “घाशीराम कोतवाल” हे मराठी रंगभूमीवरील अजरामर नाटक असून मराठीत या नाटकाचे 1,238 प्रयोग झाले आहेत, अशी माहिती सुप्रसिद्ध अभिनेते आणि “रात्रीस खेळ चाले” या मालिकेतील अण्णा नाईक अर्थात माधव अभ्यंकर यांनी दिली.
मराठी रंगभूमीवर अजरामर ठरलेल्या संगीतमय, भव्य आणि राजकारणावर भाष्य करणाऱ्या घाशीराम कोतवाल या नाटकाचे दोन प्रयोग, बेळगावात दि. 8 मार्च रोजी आयोजित करण्यात आले आहेत. रोटरी क्लब ऑफ बेळगाव यांच्यावतीने सरकारी शाळांच्या मदती करता हे प्रयोग आयोजित केले जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर बेळगावात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत अभिनेते माधव अभ्यंकर बोलत होते. ते पुढे म्हणाले, पेशवाई काळाची पार्श्वभूमी असलेले घाशीराम कोतवाल हे नाटक राजकारणावर भाष्य करणारे आहे. 1994 सालापासून घाशीराम कोतवाल या नाटकाचे प्रयोग नव्या संचात सुरू झाले आहेत.
संगीत नृत्यमय असे हे नाटक नाट्य रसिकांनी गौरविलेले आहे. नव्या पिढीतील प्रतिभावंत कलाकारांनी घाशीराम कोतवाल दमदारपणे सादर केले आहे. घाशीराम कोतवाल हे नाटक अभिनयाची कार्यशाळा आहे. घाशीरामच्या माध्यमातून अनेक नवे प्रतिभावंत कलाकार मराठी रंगभूमीला मिळालेले असून अडीच तासांचे हे नाटक कलाकारांचा कस दाखविणारे आहे.
या नाटकाचे विविध भाषांत प्रयोग झाले आहेत. मराठी भाषेतील घाशीराम कोतवाल या नाटकाचे आत्तापर्यंत 1238 प्रयोग झाले आहेत. 40 रंगकर्मींचा संच असलेल्या घाशीराम कोतवाल या नाटकाला, आजही महाराष्ट्रासह संपूर्ण देशात उस्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
बेळगाव येथे येत्या रविवार दि. 8 मार्च 2020 रोजी महिला दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ बेळगाव नॉर्थ यांच्या वतीने घाशीराम कोतवाल या नाटकाचे दोन प्रयोग केएलई संस्थेच्या शताब्दी सभागृहात आयोजित करण्यात आले आहेत. या प्रयोगांच्या माध्यमातून मिळणारा मदत निधी सरकारी शाळांच्या सुधारण्यासाठी वापरण्यात येणार आहे. त्यामुळे मराठी रंगभूमीवरील अजरामर ठरलेल्या घाशीराम कोतवालला बेळगावचे नाट्यरसिक उस्फूर्त प्रतिसाद देतील, असा विश्वास माधव अभ्यंकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
अभिनेते माधव
पत्रकार परिषदेस अभ्यंकर यांच्या पत्नी सौ. रेखा अभ्यंकर यांच्यासह रोटरी क्लब ऑफ बेळगाव नोर्थचे अध्यक्ष एस. सुरेश,जी. एस. पाटील, प्रकाश पाटील, दुर्गेश हरीटे व अन्य सदस्य उपस्थित होते.