तीन वर्षांपूर्वी तत्कालीन केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री यांनी बेळगाव शहरासाठी मंजूर केलेले पूर्ण क्षमतेचे फुल फ्लेज एफ एम रेडिओ स्टेशन प्रत्यक्षात सुरु होण्याऐवजी कागदोपत्री धूळखात पडून राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. एकंदर बेळगावातील एफ एम रेडिओ स्टेशनचे स्वप्न हे स्वप्नच राहणार आहे.
तीन वर्षांपूर्वी आपल्या बेळगाव भेटीप्रसंगी तत्कालीन माहिती आणि प्रसारण खात्याचे केंद्रीय मंत्री राजवर्धन सिंग राठोड यांनी ऑल इंडिया रेडिओ (एअर) कडून बेळगाव शहरात फुल फ्लेज अर्थात पूर्णक्षमतेने चालणारे एफ एम रेडिओ स्टेशन सुरू केले जाईल अशी घोषणा केली होती. मंत्री राठोड यांनी गेल्या जून 2017 मध्ये ही घोषणा केली असली तरी त्यासंदर्भात अद्याप कोणतीच हालचाल झालेले नाही. बेळगाव जिल्हा हा खूप मोठा जिल्हा आहे आणि बेळगाव शहर हे देशातील सुंदर शहरांपैकी एक असल्यामुळे एफ एम रेडिओ स्टेशनसाठी ते अगदी योग्य आहे, असे वक्तव्य त्यावेळी राठोड यांनी केले होते. त्याचप्रमाणे तात्काळ जागेवर त्यांनी या एफएम रेडिओ स्टेशनला मंजुरीही दिली होती. मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांच्या या निर्णयाचे बेळगावकरांनी देखील मोठ्या प्रमाणात स्वागत केले होते.
माजी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री राजवर्धन सिंग राठोड यांच्या बेळगावातील एफ एम रेडीओ स्टेशनच्या घोषणेनंतर आतापर्यंत तीन केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाले आहेत. मात्र एकाही अर्थसंकल्पात या रेडिओ स्टेशनचा उल्लेख झालेला नाही. तसेच या तीन वर्षात एफ एम रेडिओ स्टेशन संदर्भात कोणताही पाठपुरावा झालेला नाही. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्र्यांनी बेळगावसाठी रेडिओ स्टेशन मंजूर केले आहे हे जणू सर्वजण विसरूनच गेले आहेत.
सध्या बेळगाव शहरात केएलई सोसायटीकडून समाज केंद्रित ‘वेणूध्वनी’ हे एफ एम स्टेशन चालविले जाते. बेळगाव शेजारील धारवाड व कोल्हापूर या शहरांसह गोव्यात सरकारच्या ऑल इंडिया रेडिओ (एअर)कडून रेडिओ स्टेशन्स चालविली जातात. बेळगावमध्ये अकार्यक्षम फ्रिक्वेन्सीमुळे नागरिकांना रेडिओचा लाभ घेता येत नाही.
रेडिओकडून देशातील 98 टक्के भौगोलिक प्रदेश व्यापला जातो. गेल्या काही वर्षापासून केंद्राकडून खाजगी आणि समाज केंद्रित रेडिओ स्टेशनला प्रोत्साहन दिले जात आहे. दरम्यान बेळगावातील रेडिओ स्टेशनबाबत उदासिनता दाखविली जात असल्याने नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होताना दिसत आहे.