“स्केटिंग” या क्रीडा प्रकारात सातत्याने चमकदार कामगिरी नोंदवणाऱ्या बेळगाव रोलर स्केटिंग अकॅडमीच्या स्केटिंगपटूंचा भव्य सत्कार समारंभ नुकताच उत्साहात पार पडला.
बेळगाव रोलर स्केटिंग अकॅडमी, बेळगाव डिस्ट्रिक्ट स्केटिंग असोसिएशन, एस. के. इंटरनॅशनल स्पोर्ट्स अँड कल्चरल अकॅडमी आणि माय स्टाईल डान्स अँड फिटनेस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील गुड शेफर्ड सेंट्रल स्कूलच्या आंतरराष्ट्रीय स्केटिंग मैदानावर गेल्या बुधवारी या समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून अविनाश पोतदार, डॉ. प्रीती कोरे, राज घाटगे, कोसराजू सरला, सूर्यकांत हिंडलगेकर व महेश जाधव उपस्थित होते. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते इंटर क्लब, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीयस्तरावरील रोलर स्केटिंगमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बेळगाव रोलर स्केटिंग अकॅडमीच्या मुलं-मुली स्केटिंगटूंचा रोख बक्षीस शिष्यवृत्ती आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे प्यास फाउंडेशनच्या बेळगाव ते दिल्ली स्केटिंग रॅलीप्रसंगी जो लाईव्ह ऑर्केस्ट्रा सादर केला जाणार आहे. त्या आर्केस्ट्राचे प्रमुख संतोष गुरव आणि त्यांचे सहकारी तसेच गायक राजू गवळी यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी बेळगाव रोलर स्केटिंग अकॅडमी, बेळगाव डिस्ट्रिक्ट स्केटिंग असोसिएशन, एस. के. इंटरनॅशनल स्पोर्ट्स अँड कल्चरल अकॅडमी आणि माय स्टाईल डान्स अँड फिटनेस अकॅडमीचे पदाधिकारी व सदस्य, पालक वर्ग आणि हितचिंतक बहुसंख्येने उपस्थित होते. समारंभ यशस्वी रित्या पार पडण्यासाठी सूर्यकांत हिंडलेकर, प्रशांत कांबळे, विशाल वेसणे, ज्योतिबा पाटील, सुरज मिसाळे, सतीश पाटील, कृष्णकुमार जोशी, योगेश कुलकर्णी, संदेश पाटील आदींनी विशेष परिश्रम घेतले.