केएलई हॉस्पिटल व जेएनएमसी येथील रस्त्याशेजारी घालण्यात येत असलेल्या उथळ स्वरूपातील ड्रेनेज पाईप लाईनबद्दल नागरिकांमध्ये सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे.
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत केएलई हॉस्पिटल व जे.एन. मेडिकल कॉलेज येथील रस्त्याशेजारी सध्या देण्याचे पाईप घालण्याचे काम सुरू आहे. अत्यंत घाण सांडपाण्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये, नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचू नये यासाठी ड्रेनेज अर्थात भुयारी गटार हे जमिनीत किमान 4 – 5 फूट खाली घालावयाचे असते. जमिनीखाली घालण्यात येत असल्यामुळेच त्याला ड्रेनेज अर्थात भुयारी गटार असे म्हटले जाते. तथापि जेएनएमसी येथील जवळपास रस्त्याशी समांतर अशी ड्रेनेज पाईपलाईन घालण्याची पद्धत पाहता नागरिकांवर कपाळाला हात लावण्याची वेळ आली आहे.
याठिकाणी देण्याची पाईपलाईन इतकी उथळ घालण्यात आले आहे की ती जमिनीखाली घालण्यात येत आहे की, जमिनीच्या पृष्ठभागावर घालण्यात येत आहे? असा प्रश्न नागरिकांना पडू लागला आहे. या पद्धतीने ड्रेनेज पाईपलाईन घातल्यास पावसाळ्यात सदर रस्ता ड्रेनेजच्या सांडपाण्याने व्यापुन नाहीसा होणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
सर्व मार्गदर्शक तत्वे धाब्यावर बसून सदर ड्रेनेज पाईपलाईन घालण्याचे काम सुरू असून याकडे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष घालावे, अशी मागणी जागरूक नागरिकांकडून केली जात आहे. तसेच ड्रेनेज पाईपलाईन घालण्याचा हा आगळा नमूना सध्या या परिसरात चर्चेचा विषय बनला आहे.