संपूर्ण जगभरात सध्या कोरोना व्हायरसची चर्चा सुरू असून बेळगावही त्याला अपवाद नाही. या प्राणघातक व्हायरसची कुणालाही लागण होऊ नये यासाठी बेळगाव मधील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये विशेष विभाग सुरू करण्यात आला आहे.
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये विशेष विभाग सुरू करण्याबरोबरच हॉस्पिटलच्या भिंती वॉर्डमधील फरश्या, खिडक्या यांचीसुद्धा स्वच्छता करण्यात येत आहे. आज रविवारी पाण्याचा फवारा मारून हॉस्पिटलच्या भिंती स्वच्छ करण्यात आल्या. रविवारी सुट्टीचा दिवस असूनही स्वच्छता कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेचे काम सुरूच ठेवले होते. महिला आणि पुरुष सफाई कर्मचाऱ्यांकडून प्रत्येक वार्डमधील भिंती आणि खिडक्या तसेच फरश्या स्वच्छ करण्यात आल्या.
याशिवाय कोरोना व्हायरस बाधित संशयित रुग्णांसाठी हॉस्पिटलमध्ये खास ‘आयसोलेटेड’ विभाग सुरू करण्यात आला आहे. दररोज या विभागाची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. शिवाय नावाप्रमाणेच आयसोलेटेड अर्थात फारसा जनसंपर्क नाही अशा ठिकाणी हा विभाग सुरू करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर कोरोना व्हायरसबाबत जनजागृतीही करण्यात येत आहे.
हॉस्पिटल प्रशासनाकडून हॉस्पिटलमध्ये या व्हायरसच्या प्रतिबंधासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात येत आहे. त्याबरोबरच शहरात या व्हायरसबद्दल माहिती देणारे फलकही लावण्यात येणार असल्याचे बीम्सचे वैद्यकीय संचालक डॉ. विनय दास्तीकोप यांनी ‘बेळगाव लाइव्ह’शी बोलताना सांगितले.