भारतीय जनता पक्ष आगामी बेळगाव महानगरपालिकेसह जिल्हा पंचायत, तालुका पंचायत आणि ग्रामपंचायत निवडणुका पक्षांच्या सिम्बॉल वर लढविणार असून बेळगाव महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी कामाला लागा, असा आदेश भाजपचे कर्नाटक राज्याध्यक्ष नळीन कुमार कटील यांनी दिला आहे.
रेल्वे ओव्हर ब्रिज नजीकच्या मराठा मंदिर येथे आयोजित भाजपच्या नूतन जिल्हाध्यक्षांसह अन्य पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण समारंभाप्रसंगी ते बोलत होते.
भारतीय जनता पक्षाने बेळगाव महानगरपालिकेसह आगामी जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायत पंचायत निवडणूका पक्ष चिन्हावर लढविण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि यापैकी बेळगाव महानगरपालिका आणि जिल्हा पंचायत निवडणूकीवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले जाणार आहे. यासाठी नूतन पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे, असे आवाहन राज्याध्यक्ष नळीन कुमार कटील यांनी केले.
याप्रसंगी भाजपचे नूतन जिल्हाध्यक्ष माजी आमदार संजय पाटील, नूतन महानगर अध्यक्ष शशिकांत पाटील, आमदार अॅड. अनिल बेनके, आमदार अभय पाटीलआदी व्यासपीठावर उपस्थित होते.
दरम्यान, नूतन पदाधिकाऱ्यांच्या अधिकार समारंभास उपस्थित राहण्यासाठी आज बुधवारी सकाळी रेल्वेने राज्याध्यक्ष नळीन कुमार कटील यांचे रेल्वेने बेळगाव रेल्वेस्थानकावर आगमन झाले. याप्रसंगी नूतन जिल्हाध्यक्षांसह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. बेळगावातील आगमनानंतर नळीन कुमार कटील यांनी सर्वप्रथम कोर कमिटीची बैठक घेतली. या बैठकीत पक्षसंघटना बळकट करण्यासंदर्भातील चर्चेबरोबरच त्यांनी बेळगाव महानगरपालिका निवडणुकीसह अन्य महत्त्वाच्या निवडणुकांसंदर्भात उपस्थित सदस्यांशी चर्चा केली. तसेच प्रामुख्याने बेळगाव महानगरपालिका आणि जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष पूर्ण ताकदीनिशी उतरणार असल्याचे स्पष्ट केले.
ज्या अमेरिकेने मोदींना विजा नाकारला होता त्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आता मोदींजींना भाऊ म्हणत आहेत. देशात होत असलेल्या दंगलीना काँग्रेस कारणीभूत आहे मोदींच्या नावाला काळिमा फासण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे काँग्रेस कडूनच देश द्रोहाचे काम होत आहे असा आरोप देखील नळीन कुमार यांनी केला.
राज्यात बी एस येडीयुरप्पा यांचे चांगले काम सुरू आहे आगामी तीन वर्षात अयोध्येत राम मंदिर पूर्ण होइल भाग्यलक्ष्मी योजना तसेच कर्जमाफी ने शेतकऱ्यांचा भार हलका केला आहे.पुढील तीन वर्षे तेच मुख्यमंत्री राहतील आणि उत्तम शासन देतील असे ते म्हणाले.कुमारस्वामी यांच्या कार्यकाळात अनेक निष्पाप हिंदूंची हत्त्या करण्यात आली आहे अधिकारी विध्यार्थी यांना रक्षण दिले नाही असे त्यांनी म्हणाले.