राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कुस्ती क्षेत्रात अत्यंत उल्लेखनीय कामगिरी बजावणारा मुचंडी (ता. बेळगाव) गावचा आदर्श आणि होतकरू मल्ल अतुल सुरेश शिरोळे याला क्रीडा विकास परिषद (भारत) या संस्थेतर्फे गुणवंत खेळाडूंसाठी असलेला राष्ट्रीय पातळीवरील “मास्टर चंदगीराम राज्य पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
शाहू स्मारक, दसरा चौक, कोल्हापूर येथे शुक्रवारी दुपारी मास्टर चंदगीराम क्रीडा पुरस्कार वितरण सोहळा आणि हिंदू रत्न राज्य क्रीडा अधिवेशन उत्साहात पार पडले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे हिंदकेसरी दीनानाथ सिंह आणि आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू संग्राम चौगुले यांच्या हस्ते अतुल शिरोळे याला “मास्टर चंदगीराम राज्य क्रीडा पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले. यावेळी अतुल याला सन्मानपत्र, गौरव पदक आणि बॅच देण्यात आले. व्यासपीठावर क्रीडा विकास परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल काळेल, महासमा सुभाष भंडारे आदी उपस्थित होते.
मुचंडी (ता. बेळगाव) येथे लहानाचा मोठा झालेल्या अतुल शिरोले याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मुचंडी येथील शाळेत झाले असून पदवीपूर्व शिक्षण मराठा मंडळ कॉलेजमध्ये तर पदवी शिक्षण आरपीडी महाविद्यालयात झाले आहे. यंदा त्याने कला शाखेची पदवी संपादन केली आहे गेल्या 22 वर्षांपासून अतुल कुस्ती क्षेत्रात आहे शिरोळे घराण्याला कुस्तीची परंपरा आहे अतुल चे वडील सुरेश शिरोळे आणि आजोबा-पणजोबा हे कुस्तीगीर होते अतुल शिरोलेने त्यांचा वारसा जपत वयाच्या तिसऱ्या वर्षापासून कुस्ती खेळण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही आजपर्यंत अनेक राष्ट्रीय पातळीवरील कुस्ती स्पर्धांमध्ये सुयश मिळवणाऱ्या अतुल शिरोले याने तीन आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धांमध्ये आपली चमक दाखविली आहे.
गेल्या 2019 साली सातारा – कराड येथे आयोजित कुस्ती मैदानात अतुल शिरोले याने ज्युनिअर महाराष्ट्र केसरी किताबासह चांदीची गदा हस्तगत केली आहे. याखेरीज 2016 साली रशिया येथे झालेल्या कॅडेट वर्ल्ड चॅम्पियन कुस्ती स्पर्धेत अतुलने 19 वर्षाखालील 86 किलो वजनी गटात तिसरा क्रमांक पटकाविला. त्याचप्रमाणे 2017 साली युरोपमधील तुर्कस्तान येथे झालेल्या पाचव्या इनडोअर एशियन गेम्समध्ये कडवी लढत देऊन देखील अतुलला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. गेल्या 2019 सालामध्ये गणेश चतुर्थी दरम्यान दक्षिण कोरियामध्ये झालेल्या सिनीयर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावताना अतुल शिरोळे याने 80 किलो वजनी गटात तिसरा क्रमांक पटकाविला.
अतुल याला कुस्ती प्रशिक्षक परशराम मोदगेकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. मुचंडी गावातील शिवनेरी तालमीमध्ये कुस्तीचा सराव करणारा शिरोळे हा गावातील लहान मुलांना कुस्तीचे प्रशिक्षण देतो. अतुल याचे वडील सुरेश शितोळे हे अल्पभूधारक शेतकरी असल्यामुळे गवंडी काम देखील करतात. एकंदर अतुल शिरोळे याची घरची परिस्थिती अत्यंत बेताची आहे. तथापि घरच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आजपर्यंत अतुल शिरोळे याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. देशाचे नाव उज्ज्वल करू शकणाऱ्या मल्लांपैकी अतुल हा एक मल्ल आहे. त्याच्या यशाचे कौतुक व्हायलाच हवे…