माशांपासून बनविण्यात येणारे किनारपट्टीवरील लोकप्रिय खाद्यपदार्थ बेळगांवसह विविध 11 जिल्ह्यांमध्ये उपलब्ध करण्याची तयारी राज्य शासनाकडून केली जात असून यासाठी मत्स्योद्योग खात्याकडून संबंधित जिल्ह्यांमध्ये ‘मस्त्यदर्शिनी केंद्रं’ स्थापन करण्यात येणार आहेत.
सध्या बेंगलोरसह राज्यातील तुमकुर, शिमोगा, कोलार व बेळ्ळारी येथे मस्त्यदर्शिनी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांना खवय्यांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. यामुळेच या केंद्राचा विस्तार बेळगावसह गुलबर्गा, विजापूर, रायचूर, हुबळी व उडुपी येथे हे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या केंद्रात मिळणारे खाद्यपदार्थ दर्जेदार असणार आहेत. शिवाय खासगी हॉटेलमध्ये मिळणाऱ्या दरापेक्षा अर्ध्या किंमतीत माशांपासून बनवलेले विविध खाद्यपदार्थ या केंद्रांमध्ये उपलब्ध केले जाणार आहेत.
राज्यातील सर्व मस्त्यदर्शिनी केंद्रे मत्स्योद्योग विकास महामंडळातर्फे चालविली जाणार आहेत. या केंद्रांसाठी जागा निश्चित करावी, असे संबंधित सर्व जिल्हाधिकार्यांना कळविण्यात आले आहे. या सर्व केंद्रांना किनारपट्टीतून माशांचा पुरवठा केला जाणार आहे. त्याकरीता नवे इन्सुलेटर वाहन खरेदी करण्याची सूचनाही देण्यात आली असून या केंद्राबरोबरच संचारी केंद्रेही सुरू करण्यात येणार आहे. मोबाईल कॅंटीनच्या धर्तीवर 20 मोबाईल वाहने, खाजगी मत्स्यदर्शिनी केंद्र, नवे संचारी मत्स्यविक्री करणारे दुकान गाळे स्थापन करण्याची तयारीही मत्स्योद्योग महामंडळाकडून केली जात आहे.