इन्व्हेस्ट मीट हुबळी ऐवजी बेळगावला घेण्यात यावी या मागणीवरून बेळगाव भाजपमध्ये शीत युद्ध सुरू असताना बेळगाव व हुबळी यावरून पुन्हा एकदा नवीन वादाला सुरुवात झाली आहे.नेहमी बेळगावला डावलले जाते हुबळीला प्राधान्य देण्यात येतो असे असताना रेल्वे राज्य मंत्री आणि बेळगावचे खासदार सुरेश अंगडी यांनी हुबळी विमान तळाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळावा अशी मागणी केली आहे.
“इन्व्हेस्ट कर्नाटका” या शीर्षकाखाली गुंतवणूकदारांसाठी हुबळी येथे शुक्रवारी आयोजित गुंतवणूकदारांच्या परिषद उद्घाटन समारंभाप्रसंगी बेळगावच्या उत्कर्षाच्या गप्पा मारणारे बेळगावचे खासदार आणि विद्यमान रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी सर्वांगाने आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दर्जास जास्त पात्र असणाऱ्या बेळगावला डावलून हुबळीकडे आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा प्राप्त होण्याची क्षमता आहे, असे वक्तव्य करत हुबळी प्रेम दाखवले आहे या वक्तव्याचा सर्वसामान्य बेळगाववासियांसह जाणकार मंडळींमध्ये तीव्र निषेध व्यक्त होत आहे.
हुबळी येथे शुक्रवारी “इन्व्हेस्ट कर्नाटका” या कार्यक्रम वजा गुंतवणूकदारांच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत उपलब्ध माहितीनुसार उत्तर कर्नाटकातील 51 उद्योग समूह अर्थात कंपन्यांनी गुंतवणुकीचे प्रस्ताव ठेवले आहेत सदर परिषदेच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी बेळगावचे खासदार व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी आपल्या भाषणात उत्तर कर्नाटकात रेल्वेसाठीचे सुटे भाग, विमानचालन, ऑटोमोबाईल पॉवरलूम अर्थात हातमाग केंद्रांची गरज आहे. ही गरज भागवण्या बरोबरच हुबळी विमानतळाकडे भावी काळात आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा प्राप्त होण्याची क्षमता आहे असे वक्तव्य केले आहे. बेळगाव विमानतळाला कमी लेखून केलेल्या या वक्तव्याचा समस्त बेळगावकरांनी निषेध केला आहे. तसेच बेळगावच्या उत्कर्षाच्या गप्पा मारणाऱ्या मंत्री अंगडी यांना बेळगाव विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा प्राप्त होण्यासाठी किती लायक आहे याची माहिती नसेल तर त्यांनी बेळगावच्या जनतेचे प्रतिनिधित्व करणे बंद करावे अशा तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
बेळगावचे सांबरा येथील विमानतळ हे ब्रिटिशकालीन विमानतळ आहे. तत्कालीन काळात हवाईमार्गे स्वातंत्र्याचा लढा मोडून काढण्यासाठी वेळेवर लष्करी रसद त्वरित पुरवता यावी यासाठी, तसेच भविष्यकालीन विचार करून ब्रिटिशांनी या विमान उड्डाण व आगमनास योग्य अशा अतिशय सक्षम विमानतळाची सांबरा येथे उभारणी केली. बेळगावच्या विमानतळाची धावपट्टी अडीच किलोमीटर इतकी आहे. नियमानुसार आंतरराष्ट्रीय विमानतळाची धावपट्टी अर्थात रन-वे 3 हजार मीटर्सचा असावा लागतो. बेळगाव विमानतळाचा रन-वे त्यामानाने थोडी कमी असला तरी तो वाढवता येऊ शकतो. राज्यातील बेंगलोर व मंगळूर विमानतळानंतर बेळगावचे विमानतळ हे भौगोलिक दृष्ट्या सर्वोत्तम मानले जाते. येथील टर्मिनल बिल्डिंगच 8 हजार चौरस फुटामध्ये विस्तारलेली आहे. दिग्गज जाणकार देखील विमानतळाच्या तुलनेत बेळगावचे विमानतळ हे कितीतरी पटीने सरस असल्याचे मान्य करतात. ही वस्तुस्थिती असताना हुबळी विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा मिळू शकतो असे वक्तव्य स्वतः बेळगावचे रहिवासी असणारे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी केल्यामुळे ते खरोखरच बेळगावच्या विकासासाठी बांधील आहेत का?एवढं हुबळीचे प्रेम का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
शहरानजीकच्या मंडोळी गावाजवळ असणाऱ्या एमएलआयआरसीच्या फायरिंग रेंज स्थलांतर प्रकरणी सध्या मंत्री सुरेश अंगडी यांनी लक्ष घातले आहे.संबंधित फायरिंग रेंज हे खरे तर बेळगावचे भूषण आहे. देशात बेळगाव हे मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर आणि देशभक्त घातक कमांडो निर्माण करणाऱ्या ज्युनियर लीडर विंग अर्थात जे.एल. विंगसाठी सुपरिचित आहे. तथापि नागरिक सुरक्षा आणि विकासाचे कारण पुढे करून सध्या मंडोळी गावानजीकचे लष्कराचे फायरिंग रेंज हटविण्याचा घाट रचला जात आहे का? याबाबत देखील चर्चा सुरू झाली आहे.