बेळगाव येथे प्रशिक्षणादरम्यान बेपत्ता झालेल्या एका जवानाचा मृतदेह पंढरपूर
तालुक्यातील खर्डी येथील रेल्वे गेटनजीक रुळावर आढळून आला आहे. हा आत्महत्येचा प्रकार आहे की घातपात? याबाबत तपास सुरू आहे.
सुखदेव भागाप्पा अनुसे (वय 28, रा. बेंकळी, ता. जत, जि. सांगली) असे मृत जवानाचे नाव आहे. सुखदेव अनुसे हा जवान जम्मू काश्मीरमधे सेवा बजावत आहे. सध्या हा जवान बेळगाव येथे प्रशिक्षणासाठी आला होता. मात्र प्रशिक्षणादरम्यान तो अचानक बेपत्ता झाला होता. याबाबतची अधिक माहीती अशी की , महाराष्ट्रातील जत तालुक्यातील बेंकळी येथील सुखदेव भागाप्पा अनुसे 2013 भारतीय लष्करी सेवेत रूजू झाले होते. सध्या ते जम्मू आणि काश्मिर याठिकाणी सेवा बजावत होते. गेल्या रविवारी ते बेळगाव येथील ट्रेंनिंग सेंटरमधे लष्करी प्रक्षिशणासाठी दाखल झाले होते. मात्र त्यानंतर अवघ्या एक दिवसानंतर म्हणजे सोमवारपासून ते बेळगावातून अचानक बेपत्ता झाले होते. तेव्हा शोधाशोध करून शेवटी सुखदेव अनुसे बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.
गेल्या सोमवारी सुखदेव अनुसे बेपत्ता झाल्यानंतर आज सहाव्या दिवशी पंढरपूर तालुक्यातील खर्डी याठिकाणी त्यांचा मृतदेह आढळून आला. खर्डी याठिकाणी रेल्वे फटकानजीक रेल्वेरूळावर मृतावस्थेत आढळलेल्या सुखदेव यांच्या खिशामधे काही कागदपत्रे आढळून आली असून कोल्हापूर ते सोलापूर रेल्वे तिकीटे देखिल सापडली आहेत.
सदर घटनेची पोलिसात नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, सुखदेव अनुसे यांनी नक्की आत्महत्या केली, की अन्य काही ? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सुखदेव यांच्या मृत्यूची माहीती पोलिसांनी त्यांच्या कुंटुबियांनी दिली आहे. याप्रकरणी तालुका पोलिस निरिक्षक किरण अवचर पुढील तपास करीत आहेत.