खानापुर तालुक्यात शेतात गेलेल्या शेतकऱ्यावर अचानकपणे अस्वलाने हल्ला केल्याने शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
खानापूर तालुक्यातील आमगाव येथील शेतकरी या घटनेत गंभीर जखमी झाला असून उपचारासाठी त्याला बेळगांव जिल्हा रुग्णालयात तात्काळ दाखल करण्यात आले आहे.सध्या त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात येत आहेत. सदर घटना गुरुवारी दुपारी 1 च्या सुमारास घडली होती.
याबाबत समजलेल्या अधिक माहितीनुसार खानापुर तालुक्यातील आमगांव येथील लक्ष्मण सहदेव घाडी (वय 70 वर्ष) यांच्या घराच्या बाजुला लागून शेत आहे. शेतात जात असतांना गुरुवारी वारी(दि. 20) दुपारी 1 च्या सुमारास शेतात लपून बसलेल्या अस्वलाने अचानक त्यांच्यावर हल्ला करून त्याच्या हाताचा व पायाचा चावा घेतला. त्यात ते गंभीर जखमी झाले. अशा जखमी अवस्थेतही त्यांनी आपला बचाव केला व पुढील मोठा अनर्थ टळला.
![Beer attacks farmer injured](https://belgaumlive.com/wp-content/uploads/2020/02/FB_IMG_1582207767230.jpg)
घटनास्थळी वनअधिकाऱ्यांनी भेट दिली असुन तोपर्यंत अस्वल तेथून निघून गेला होता. या प्रकरणाची पुढील चौकशी वनपाल करीत आहेत . खानापूर तालुक्यातील वन प्राण्यांच्या हल्ल्यात अनेक शेतकरी जखमी होतच असतात वन खात्याने अश्या प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.