अतलगा येथे नागरिकांचा विरोध असताना देखील बार सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना याची मोठी डोकेदुखी वाढू लागली आहे. या बारमध्ये मद्यपी मोठ्या प्रमाणात हाणामारी करत असल्याचे प्रकार निदर्शनात येत आहेत. त्यामुळे कोणतीही मोठी घटना घडू शकते याचा विचार करून हा बार बंद करावा अशी मागणी परिसरातील नागरीकातून होत आहे.
या बारमध्ये वारंवार हाणामारीचे प्रकार घडत आहेत. मात्र बार चालक याकडे दुर्लक्ष करून आपला व्यवसाय चालविण्याच्या नादातच असल्याचे दिसून येत आहे. मध्यंतरी काही टोळक्यांनी येथे मोठा धुडगूस घातला होता. त्यामुळे ये-जा करणाऱ्या तून भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या घटना वारंवार घडत असले तरी याकडे साफ दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे याबाबत गांभीर्याने विचार करून येथील होणारे गैरप्रकार थांबवावे अशी मागणी होत आहे.
काही मद्यपी बारमधून दारू घेऊन त्या शेतामध्ये पिण्याचे प्रकार वाढल्याने शेतकऱ्यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. याबाबत तक्रार करून देखील कानाडोळा करण्यात आला. मात्र शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे. बाटल्या आणि प्लास्टिक ग्लास व इतर कागद गोळा करण्यातच शेतकऱ्यांचा वेळ जात असल्याचे प्रकार दिसून येत आहेत. त्यामुळे यापुढे तरी असे प्रकार रोखावेत अन्यथा हे बार बंद करावे अशी मागणी होत आहे.
शेतकऱ्यांबरोबरच येथून ये-जा करणार्या नागरिकांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे याबाबत संताप व्यक्त होत आहे. हा बार बंद करावा अन्यथा परिसरातील नागरिक आंदोलन छेडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा ही देण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित बार मालकांनी होणारे गैरप्रकार टाळण्याची गरज निर्माण झाली आहे.