भेसळयुक्त दूध तयार करणाऱ्या अथणी तालुक्यातील दोघाजणांना पोलिसांनी रंगेहात पकडून अटक केली असून त्यांच्याकडील शेकडो लिटर भेसळयुक्त दूध आणि ते दूध बनविण्यासाठी लागणारे साहित्य असा हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
महालिंग जाधव (वय 45, रा. अरळीहट्टी, ता. अथणी) आणि अमरअली हाजीसाब अन्सारी (वय 23, रा. झुंजवाड, ता. अथणी) अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबतची अधिक माहिती अशी की, अरळीकट्टी गावामध्ये एका घरात दूधात भेसळ केली जात असल्याची माहिती मिळताच अथणी पोलिसांनी त्या घरावर अचानक छापा टाकून महालिंग याला ताब्यात घेतले. तसेच त्याने प्लास्टिक कॅनमध्ये तयार करून ठेवलेल्या भेसळयुक्त दूधासह पांढऱ्या रंगाचा द्रव साठवलेले एक प्लास्टिक बॅरेल, भेसळीसाठी वापरण्यात येणारे खाद्य तेलाचे डबे, पावडर, मिक्सर आधी साहित्य जप्त केले. या प्रकरणी अथणी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी झुंजवाड (ता. अथणी) येथे भेसळयुक्त दूध तयार करणाऱ्या अमरअली हाजीसाब अन्सारी याला डीसीआयबीच्या पथकाने रंगेहात पकडून त्याच्याकडील 665 लिटर भेसळयुक्त दूध आणि भेसळीसाठी लागणारे साहित्य असा एकूण 49,270 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या मुद्देमालामध्ये पाम ऑइलची प्रत्येकी एक लिटरची 90 पाकिटे, दुधाचे माप, मिक्श्चर आदी साहित्याचा समावेश आहे.
डीसीआयबीचे पोलीस निरीक्षक निंगणगौडा पाटील, डी. के. पाटील, पी. के. कोळची, व्ही. व्ही. गायकवाड, एस. एस. मंगण्णावर, अर्जुन मसरगुप्पी आदींचा समावेश असणाऱ्या पथकाने ही कारवाई केली. उपरोक्त कारवाईमुळे भेसळ करणाऱ्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले असून ही कारवाई येत्या भविष्यकाळात अधिक तीव्र होणार आहे. अथणी तालुक्यात अलीकडे कांही दिवसांपासून भेसळयुक्त दूध तयार करण्याच्या घटना उघडकीस येत असल्यामुळे हा एक चर्चेचा विषय बनला आहे.