शिक्षण नाही, श्रीमंती नाही हे कांही प्रगतीचे अडचण ठरू शकत नाहीत. मी केवळ सातवी पास झालो आहे, आणि 35 रुपये पगारावर नोकरी केली आहे. परंतु आज चित्रपट सृष्टीत येथवर येऊन पोहोचलो आहे. त्यामुळे तुमचा निर्धार तुमची जिद्द आणि सचोटी याच गोष्टी तुमच्या प्रगतीसाठी पूरक ठरतात. मी येथे आलो म्हणून आभार मानू नका मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये येणे तुम्हाला भेटणे हे माझे कर्तव्य आहे, अशा शब्दात नामवंत अभिनेते नाना पाटेकर यांनी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमधील जवानांची संवाद साधला. अचानक ठरलेल्या या भेटीने इन्फंट्री मधील जवान आनंदित झाले आणि नानाच्या बोलण्याने प्रभावितही झाले.
मराठा सेंटर बेळगाव आणि अभिनेता नाना आणि मराठा सेंटरचे नाते जुने आहे 1980 च्या दशकात 30 वर्षा पूर्वी नाना पाटेकर प्रहार सिनेमाच्या शूटिंग दरम्यान सेंटर मध्ये रहात होते त्या आठवणीना त्यांनी उजाळा दिला.
ख्यातनाम चित्रकार कै. के. बी. कुलकर्णी यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त सध्या नाना पाटेकर बेळगावमध्ये आले होते. त्या निमित्त त्यांनी नुकताच बेळगावातील सकाळी शौर्य चौकला भेट दिली. त्यानंतर मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे डेप्युटी कमांडंट जयराम यांच्याशी थेट संपर्क करून आपण येत असल्याचे कळवले. कांही वेळेतच नाना पाटेकर इन्फंट्रीमध्ये दाखल झाले. इन्फंट्रीचे ब्रिगेडियर गोविंद कलवाड यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी बोलताना नाना पाटेकर म्हणाले, येथे आल्यानंतर आपण पुन्हा एकदा मेजर चौहान झालो असे मला वाटते. तुम्ही सर्वजण शिपाई आहातच परंतु तेवढ्यावर समाधान मानू नका तर तुम्ही सुद्धा ब्रिगेडियर होण्याचे स्वप्न पहा. ते साकारण्यासाठी सर्व तऱ्हेने परिश्रम करा. कोणताही माणूस मोठा होण्यासाठी त्याचे शिक्षण त्याची श्रीमंती किंवा गरिबी हे निकष महत्त्वाचे नसतात तर त्याची जिद्द त्याची सचोटी आणि मेहनत घेण्याची त्यांची तयारी महत्त्वाची असते हे माझ्या कडे पाहूनच तुम्ही समजून घेऊ शकता. मी काही फार शिकलो नाही 30 – 35 रुपये पगारावर ती नोकरी सुद्धा केली. परंतु परिस्थितीशी सामना करत आज येथपर्यंत येऊन पोहोचलो आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा मोठे होण्याचे स्वप्न पहा आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करा. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे तुम्हाला जो काही पगार मिळतो त्यातील काही वाटा समाजाला देणे हे गरजेचे आहे. दहा वीस टक्के जरी देता आले नाही तरी 2 टक्के तरी समाजासाठी देणे हे आपल्या सगळ्यांचे कर्तव्य आहे, याचा विसर पडू देऊ नका. असाही सल्ला नाना पाटेकर यांनी दिला.
नाना पाटेकर यांनी मराठा सेंटरमधील ऐतिहासिक वस्तू, शस्त्रे आदींचे जतन केलेल्या संग्रहालयाला देखील भेट दिली. संग्रहालयाबद्दल गौरवोद्गार काढून तेथील मान्यवरांच्या प्रतिक्रिया व शुभेच्छांसाठी ठेवलेल्या रजिस्टरमध्ये ‘खूप वर्षांनी पुन्हा आलो सेंटरमध्ये. प्रहारच्या वेळी इथेच राहत होतो. आज पुन्हा नव्याने मेजर चौहान झालो. तीस वर्षे भुर्रकन उडून गेली. पुन्हा जवान होऊन जात आहे. पुन्हा परत परत येईन’, अशी प्रतिक्रिया नाना पाटेकर यांनी आपल्या स्वाक्षरीसह नमूद केली. रंगभूमी आणि चित्रपट सृष्टी गाजवणारे नामवंत अभिनेता असलेले नाना पाटेकर यांच्या भेटीने इन्फंट्रीचे जवान मात्र भारावून गेले आणि त्यांच्या छोटेखानी परंतु उपयुक्त अशा भाषणाने प्रभावितही झाले. याप्रसंगी एमएलआयआरसीचे विविध मुद्द्यावरील अधिकारी उपस्थित होते.