अल्पावधीत आदर्श लावणी सम्राज्ञी म्हणून नावलौकिक मिळवणारी बेळगाव तालुक्यातील खणगांवची सुकन्या स्नेहा अनंत नागनगौडा हिचे लावणीतील प्रभुत्व लक्षात घेऊन कोल्हापूर येथे काल शुक्रवारी तिला “नॅशनल युनिटी अवॉर्ड – 2020” (कलारत्न) हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
दसरा चौक कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवन येथे इस्लामपूर (जि. सांगली) येथील सामाजिक सेवाभावी संस्था आदर्श फाउंडेशनतर्फे काल शुक्रवारी सायंकाळी आयोजित राष्ट्रीय एकता गौरव संमेलन – 2020 या संमेलनालाप्रसंगी अध्यक्ष प्रसिद्ध अभिनेते भालचंद्र कुलकर्णी व अन्य मान्यवरांच्या हस्ते लावणी सम्राज्ञी स्नेहा नागनगौडा हिला “नॅशनल युनिटी अवॉर्ड – 2020” (कलारत्न) पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर आदर्श फाउंडेशनचे मार्गदर्शक श्रीकांत नरुले, अध्यक्ष विजय लोहार व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. लावणी या नृत्य प्रकारावर असलेले स्नेहाचे प्रभुत्व आणि लावणी नृत्यातील आत्तापर्यंतची तिची उल्लेखनीय कामगिरी लक्षात घेऊन तिला सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला.
बेळगावच्या जैन कॉलेजची विद्यार्थिनी असलेली स्नेहा नागनगौडा गेल्या 4 वर्षापासून लावणी नृत्य करत असून आपल्या अत्यंत नजाकतपूर्ण आणि ठसकेबाज लावणीद्वारे तिने आतापर्यंत अनेक अनेक पुरस्कार मिळविले आहेत. बेळगावसह महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कराड, कोल्हापूर आदी अनेक शहरांसह गोव्यातील चोर्ला, कणकुंबी आदी गावांमध्ये स्नेहाचे आजतागायत असंख्य लावणी नृत्याचे कार्यक्रम झालेले आहेत. या प्रत्येक ठिकाणी तिच्या नृत्याला रसिकांनी भरभरून दाद दिली आहे. आज एक आदर्श लावणी नृत्यांगना म्हणून स्नेहाकडे पाहिले जाते.
लावणी नृत्याव्यतिरिक्त स्नेहा नागनगौडा हिला मॉडेलिंग, डान्स आणि एक्टिंग अर्थात अभिनय यांची आवड आहे. मॉडेलिंगमध्ये आतापर्यंत तिने उल्लेखनीय यश मिळवले आहे. पुण्यामध्ये गेल्या 2019 साली आयोजित मॉडेलिंग स्पर्धेमध्ये स्नेहाने आपली वेगळी छाप पाडताना “बेस्ट स्माईल” आणि “बेस्ट रॅम्पवाॅक” हे पुरस्कार पटकाविले आहेत. तसेच बेळगाव येथे 2018 -19 साली आयोजित मॉडेलिंग स्पर्धेमध्ये तिला “ओजस मिस ब्युटी” व “मिस बेस्ट वेस्टर्न” या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
लावणी आणि मॉडेलिंग याप्रमाणे स्नेहा नागनगौडा अभिनयामध्ये देखील निपुन आहे. सध्या “जात्री बन्तू” या कन्नड लघुचित्रपटात ती काम करत आहे. सुळेभावी यात्रेच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट बनविण्यात आला असून आज शनिवारी दुपारनंतर सुळेभावी येथील मैदानावर त्याचा प्रोमो होणार असल्याचे स्नेहाने सांगितले.
स्नेहा नागनगौडा हिचे इयत्ता 7 वी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण खणगांव प्राथमिक शाळेत झाले असून बेळगावातील वनिता विद्यालयमध्ये तिने 8वी ते 10वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. सध्या ती जैन कॉलेजमध्ये बीबीए प्रथम वर्षात शिकत आहे. स्नेहा ही खणगांव येथील प्रतिष्ठित नागरिक अनंत बाबुराव नागनगौडा यांची सुकन्या आहे. कोल्हापूर येथे नॅशनल युनिटी अवॉर्ड (कलारत्न) पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल सध्या तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.