सहकाराबरोबरच शहरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रावर प्रभाव टाकणाऱी शहरातील जुनी व मोठी बँक म्हणून सुपरिचित असणाऱ्या पायोनिअर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची संचालकपदाची निवडणूक येत्या 31 जानेवारी रोजी होणार आहे. या पंचवार्षिक निवडणुकीची मतदार यादी नुकतीच जाहीर करण्यात आली असून त्यात विद्यमान प्रभारी अध्यक्ष अॅड. अमर यळ्ळूरकर यांच्यासह अन्य चार संचालकांची नांवेच गायब असल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, यासंदर्भात संबंधित पाचही जण मंगळवारी जिल्हा सहकार निबंधकांकडे (डीआर) तक्रार दाखल करणार आहेत.
पायोनियर अर्बन बँकेच्या निवडणूक मतदार यादीतून गाळण्यात आलेल्या संचालकांची नावे अॅड. अमर यळ्ळूरकर, चंद्रकांत गुंडकल, विकास कलघटगी, सतीश गौरगोंडा व शोभा कटारे अशी आहेत. पायनियर बँकेचे बहुसंख्य सभासद मराठी आहेत मात्र बँकेने नवीन अध्यादेश याबाबत माहिती देताना मराठी वर्तमानपत्रात जाहिरात दिलेली नाही तसेच अनेक सभासदांना अंधारात ठेवून 12,500 पैकी मोजक्या मतदान मतदारांना मतदानासाठी पात्र ठरविले आहे नवीन नियमांचा आधार घेत विद्यमान कार्यकारी अध्यक्षांसह पाच जणांना निवडणुकीपासून दूर ठेवले आहे.
येत्या 31 जानेवारी रोजी होणाऱ्या बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 23 जानेवारी ही आहे. त्यामुळे अर्ज करण्याच्या तयारीत असलेल्या विद्यमान संचालक अॅड. अमर यळ्ळूरकर, चंद्रकांत गुंडकल, विकास कलघटगी, सतीश गौरगोंडा व शोभा कटारे यांना नव्या नियमाप्रमाणे निवडणूक लढविता येणार नाही, असे सांगण्यात आले आहे.
आगामी काळात बँकेत नवीन 14 कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे. त्यासाठी सर्व खटाटोप करून गेल्या अनेक वर्षांपासून संचालक म्हणून चांगले काम करणाऱ्यांना निवडणुकीपासून दूर ठेवण्यात आले असल्याचा आरोप संचालकांनी केला आहे. मतदार यादीबाबत 31 जानेवारीपर्यंत आक्षेप नोंदवून घेतले जाणार होते. त्यामुळे अनेक जण आक्षेप नोंदवण्यासाठी बँकेकडे आले होते.
मात्र याच काळात मुख्य कार्यकारी अधिकारी आठ दिवस सुट्टीवर गेल्याने आक्षेप नोंदविले गेले नाहीत. नियमबाह्य पद्धतीने बनवलेली मतदार यादी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केलेल्या मनमानी कारभाराबाबत आज मंगळवारी दुपारी निवडणूक अधिकारी व सहकार निबंधकांकडे तक्रार केली जाणार असल्याचे ज्येष्ठ संचालक चंद्रकांत गुंडकल यांनी सांगितले आहे.