बीसीसीआयच्या मान्यतेने केएससीए स्टेडियम गोकाक रोड, बेळगाव येथे रविवार दि. 5 जानेवारी 2020 पासून सुरू होणाऱ्या कर्नल सी. के. नायडू करंडक 23 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेतील कर्नाटक आणि आंध्र प्रदेश यांच्यातील 4 दिवसांच्या सामन्याची जय्यत तयारी पुर्ण आली असून हा सामना अतिशय चुरशीचा होणार असल्याची माहिती केएससीए धारवाड विभागाचे निमंत्रक अविनाश पोतदार यांनी दिली.
कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या 23 वर्षाखालील संघांमधील कर्नल सी. के. नायडू करंडक स्पर्धेचा सामना येत्या 5 ते 8 जानेवारी 2020 या कालावधीत बेळगावच्या केएससीए स्टेडियमवर खेळविला जाणार आहे. यासंदर्भात आज शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत अविनाश पोतदार बोलत होते. आंध्रप्रदेश संघाने या पूर्वीचे आपले दोन्ही सामने गमावले आहेत तर कर्नाटक संघाने एक सामना जिंकला तर दुसरा सामना अनिर्णीत राहिला. यामुळे बेळगाव येथे होणाऱ्या या दोन संघांमधील कर्नल सी. के. नायडू स्पर्धेचा सामना अतिशय चुरशीचा होणार आहे, असे पोतदार यांनी स्पष्ट केले.
बेळगाव येथे यापूर्वी 5 रणजी क्रिकेट सामने झाले असून त्याच तोडीचा हा सामना असणार आहे. कर्नाटक व आंध्र प्रदेश यांच्यातील या सामन्यासाठी केएससीए स्टेडियम सुसज्ज ठेवण्यात आले आहे. स्टेडियमवरील खेळपट्टी बेंगलोरहून खास आलेल्या महिला क्युरेटरांच्या मार्गदर्शनाखाली सामन्याची खेळपट्टी तयार करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या सामन्याच्या पंचांचे उद्या शनिवारी बेळगावात आगमन होणार आहे. स्टेडियममधील खेळाडूंची ड्रेसिंग रूम आदी सर्व सोयी सज्ज ठेवण्यात आल्या असून स्कोअर बोर्डसह साईड स्क्रीन उभारण्यात आले आहेत, अशी माहितीही अविनाश पोतदार यांनी दिली.
पत्रकार परिषदेस माजी केएससीए स्टेडियम मॅनेजर व बेळगाव स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष दीपक पवार, धारवाड विभागाचे सदस्य प्रसन्ना सुंठणकर, कर्नाटक संघाचे व्यवस्थापक व्ही. के. कुमार आदी उपस्थित होते.
23 वर्षाखालील कर्नाटक क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करणारा बेळगावचा सूजय सातेरी हा यष्टीरक्षक- फलंदाज बेळगावकरांसाठी सामन्याचे मुख्य आकर्षण असणार आहे. यापूर्वी सदर स्पर्धेतील हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात सुजय सातेरी याने फलंदाजीत शैलीदार शतकासह दमदार 172 धावा झळकवताना कर्नाटकच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला होता.