उचगांव येथील सरकारी स्वस्त धान्य दुकान अर्थात रेशन दुकानातील कॉम्प्युटरसाठीचा ‘सर्व्हर’ हा नागरिकांसाठी मनस्तापाचा विषय ठरला असून याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
उचगांव येथील रेशन दुकानांमध्ये सध्या रेशन कार्डसाठी स्वाक्षर्यांसह लाभार्थींचे अंगठे घेतले जात आहेत. यासाठी सकाळी 8 वाजल्यापासून दुकानासमोर स्त्री-पुरुष लाभार्थींची गर्दी होत आहे. तथापि रेशन दुकानाच्या कॉम्प्युटर सर्व्हरमध्ये सातत्याने बिघाड होत आहे. परिणामी रेशन दुकानातील कॉम्प्युटरवर लाभार्थींच्या नोंदणीकरणाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे.
काल गुरुवारी तर याचा कहरच झाला, सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत फक्त चार लाभार्थीची आवश्यक नोंदणी कॉम्प्युटरवर होऊ शकली. परिणामी उचगांव रेशन दुकानसमोर स्त्री-पुरुषांच्या रांगा लागल्या होत्या. ताटकळत थांबावे लागत असल्याने या लाभार्थींनी चक्क रस्त्यावरच घरांच्या सावलीत बैठक मारली होती. कंटाळलेले हे सर्व लाभार्थी रेशन दुकानाच्या सर्व्हर डाऊन समस्येच्या नावाने बोटे मोडताना दिसत होते.
मिळालेल्या माहितीनुसार यापूर्वी हे रेशन दुकान सरकारी कर्मचाऱ्यांकडून चालविण्यात येत होते त्यावेळी सर्वर डाऊनची कोणतीही समस्या उद्भवत नव्हती. तेंव्हा हा प्रकार आत्ताच का घडत आहे? असा संतप्त सवाल लाभार्थी कडून केला जात आहे. तसेच अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणी लक्ष घालण्याची मागणी केली जात आहे.