दरवर्षीप्रमाणे शुक्रवार पेठ, टिळकवाडी येथील श्री इस्कॉन मंदिरातर्फे येत्या गुरुवार दि. 30 आणि शुक्रवार दि. 31 जानेवारी 2020 रोजी श्री जगन्नाथ यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार पेठ, टिळकवाडी येथील इस्कॉन मंदिरामध्ये आज मंगळवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये श्री रसामृत स्वामीजी यांनी ही माहिती दिली. श्री जगन्नाथ रथयात्रा हे केवळ एक साधारण अनुष्ठान नाही तर आध्यात्मिक सांस्कृतिक क्रांतीचे अनुष्ठान आहे. आज-काल आपला देश अनेक समस्यांनी ग्रासला आहे नाही. संपूर्ण देश आधुनिक पाश्चात्त्य विचारसरणीने प्रभावित झालेला असून नागरिकांना भारतीय शिक्षण, संस्कृती व अध्यात्म याचा विसर पडत चाललेला आहे. भारतीय संस्कृती आणि अध्यात्माची परंपरा अबाधित राखण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन ही काळाची गरज बनली आहे. प्राचीन काळात संस्कृतीच्या प्रत्येक भागात अध्यात्माचा समावेश असायचा. तथापि आजकाल अध्यात्मिक संस्कृतीचा ऱ्हास होत चालल्याचे दिसून येत आहे. यासाठीच बेळगाव सह शहर परिसरात अध्यात्माचा प्रचार व प्रसार व्हावा. नागरिकांमध्ये अध्यात्माची आवड निर्माण व्हावी यासाठी दरवर्षी इस्कॉनतर्फे श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सवाचे आयोजन केले जाते, असे श्री रसामृत स्वामीजींनी स्पष्ट केले.
दरवर्षीप्रमाणे इस्कॉनतर्फे येत्या गुरुवार 30 आणि शुक्रवार 31 जानेवारी रोजी हा महोत्सव आयोजित केला जाणार आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी गुरुवारी सालाबादप्रमाणे धर्मवीर संभाजी चौक (बोगारवेस) येथून भव्य श्री जगन्नाथ रथयात्रा काढण्यात येणार आहे. ही रथयात्रा सायंकाळी 6.30 – 7 वाजण्याच्या सुमारास शुक्रवार पेठ टिळकवाडी येथील इस्कॉन मंदिरासमोर समाप्त होईल त्यानंतर मंदिराच्या मागील बाजूस असणाऱ्या प्रशस्त जागेमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. या कार्यक्रमांमध्ये प्रवचन किर्तन भजन आणि नृत्य आधी सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असणार आहे. त्याचप्रमाणे विविध प्रदर्शने आयोजित केली जाणार असून अखेर महाप्रसादाचे वाटप केले जाईल, असे स्वामीजींनी सांगितले. विशेष म्हणजे या दोन दिवसाच्या महोत्सवादरम्यान स्वतः भक्तमंडळी स्वयंसेवकांच्या भूमिकेत सर्व कामे करणार आहेत असेही त्यांनी सांगितले.