महापालिका प्रशासनाकडून नियोजनाचा अभाव आणि अधिकाऱ्यांच्या अक्षम्य बेपर्वाईमुळे भुईकोट किल्ला नजीकच्या बेळगावचे भूषण असलेल्या देशातील सर्वाधिक 110 मीटर उंचीच्या ध्वजस्तंभावर आज प्रजासत्ताक दिनी तिरंगा ध्वज फडकलाच नसल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. तांत्रिक कारण पुढे करून देशभक्ती दर्शविणाऱ्या राष्ट्रध्वज फडकविण्याच्या पवित्र उद्देशाला काळीमा फासणाऱ्या बेळगाव महापालिका प्रशासनावर कारवाई का केली जाऊ नये? असा संतप्त सवालही नागरिकांकडून केला जात आहे.
देशाचा तिरंगा राष्ट्रध्वज नेहमीच नागरिकांच्या मनात स्फुलिंग चेतवतो. देशवासियांतील राष्ट्रप्रेम वृद्धींगत करणारा तिरंगा सर्वाधिक उंचीवर फडकला तर त्याबद्दलचे आश्चर्य, कुतूहल आणि अभिमान वाटणेही स्वाभाविकच आहे. हाच अभिमानचा क्षण बेळगावकरांना मिळाला होता. तथापी बेळगाव किल्ला तलाव येथील हिंदुस्थानातील सर्वात उंच राष्ट्रध्वज आज 26 जानेवारी 2020 प्रजासत्ताक दिनी फडकवण्यात आलाच नाही. बेळगाव महापालिकेच्यावतीने मोठा गाजावाजा करीत देशातील सर्वाधिक 110 मीटर उंचीच्या किल्ला तलावाजवळ फक्त 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि 1 नोव्हेंबर रोजी ध्वजारोहण केले जाते. मात्र आज 26 जानेवारी 2020 प्रजासत्ताक दिनी देशातील सर्वात उंच राष्र्टध्वज कांही कारणांमुळे फडकवण्यात आला नसल्याने मुळ उद्देशाला हरताळ फासण्याचे काम पालिका प्रशासनाने केले आहे.
आज सकाळी 71व्या प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणासाठी प्रशासकीय अधिकारी व मान्यवर मंडळी उपस्थित होती. मात्र काही तांत्रिक अडचण निर्माण झाली आणि ध्वज फडकवण्यात आला नाही. या प्रकारामुळे उपस्थित नागरिक अवाकच झाले. यावेळी सखेद आश्चर्य व्यक्त करत महापालिका प्रशासनाच्या अक्षम्य बेपर्वाईबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वज फडकवण्याची सर्व तयारी करून तो न फडकविणे म्हणजे ध्वजा संहितेचा पर्यायाने देशाचा अपमान करण्यासारखे आहे, हा प्रकार म्हणजे अक्षम्य गुन्हा असल्याचे परखड मत कट्टर देशप्रेमी नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
किल्ला येथील सर्वात उंच ध्वजस्तंभ यामुळे बेळगावच्या नावलौकिकात वाढ होण्याबरोबरच शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे. ध्वजस्तंभावर राष्ट्र रात्रंदिवस राष्ट्रध्वज फडकला पाहिजे या अटीवर तब्बल दीड कोटी रुपये खर्च करून हा ध्वजस्तंभ उभारण्यात आला. त्यानंतर कालांतराने यादो स्तंभावरील तिरंगा खराब होऊ लागल्यामुळे वर्षातून 15 ऑगस्ट 26 जानेवारी व एक नोव्हेंबर अशा फक्त तीन दिवशी ध्वज फडकवण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर काही दिवसांपूर्वी या संहितेचा होणारा अवमान व ध्वज फडकवताना येणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी ध्वजाचा आकार कमी करण्याचा निर्णय घेतला गेला.
आज प्रजासत्ताक दिनीचं नव्हे तर गेल्या पाच महिन्यांपासून विविध तांत्रिक कारणास्तव यादो स्तंभावर दुर्दैवाने राष्ट्रध्वज फडकलेला नाही. वाऱ्यामुळे 350 किलो वजनाच्या ध्वजाचे कापड फाटत असून वारंवार ध्वजाचे कापड बदलण्याचा खर्च वाढत आहे. पावसामुळेही ध्वजाचे वजन वाढून तो वाटत असल्याने खर्च वाढत आहे त्यामुळे गेल्या काही महिन्यापासून तो काढून ठेवण्यात आल्याचे स्पष्टीकरण महापालिका अधिकाऱ्यांकडून दिले जात आहे. तथापि या सर्वाधिक उंचीचा हा ध्वजस्तंभावर पहिल्यांदा ध्वज फडकविण्यापूर्वी जास्त उंचीवर ध्वज उभारल्याने वारा, ऊन आणि पावसामुळे तो खराब होईल हे महापालिका अधिकारी किंवा संबंधित ठेकेदाराला माहीत नव्हते का ? असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे. देशात अनेक ठिकाणी रात्रंदिवस राष्ट्रध्वज फडकत असतात भारत-पाक सीमेवरील वाघा बॉर्डरवर लष्कराने उभारलेल्या स्तंभावरील ध्वज देखील खराब होतो, मात्र तो वेळीच बदलला जातो हे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना ठाऊक नाही का?
आज प्रजासत्ताक दिनी तांत्रिक कारणामुळे किल्ल्याजवळील ध्वजस्तंभावर तिरंगा फडकविण्यात आला नाही याबद्दल संबंधित अधिकारी दिलगिरी व्यक्त करत आहेत. तथापि या अधिकाऱ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला काल शनिवारी स्तंभावर राष्ट्रध्वज व्यवस्थित फडकवता येतो की नाही याची खातरजमा करून घेता आली नाही का? इतक्या मोठ्या उंचीच्या ध्वजस्तंभावर राष्ट्र ध्वज फडकवणे ही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी करावीच लागते. तथापि बेळगाव महापालिकेच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांकडून कोणतीच खबरदारी घेतली गेली नसल्यामुळेच आज राष्ट्रध्वज फडकवण्यात बाधा आल्याचे बोलले जात आहे. एकंदर महापालिकेकडून प्रजासत्ताक दिनी घडलेल्या किल्ला येथील राष्ट्रध्वज न फडकविण्याचे कृतीमुळे शहरवासीयांच्या भावना मोठ्या प्रमाणात दुखावले गेले असून सदर ध्वजस्तंभ साठी केलेला तब्बल दीड कोटी रुपयांचा खर्च वाया गेल्याचे मत व्यक्त केले जात आहे.