इंडियन मेडिकल असोसिएशन अर्थात ‘आयएमए’तर्फे क्रीडापटू आणि क्रीडा प्रशिक्षकांसाठी शनिवार दि. 1 फेब्रुवारी 2020 रोजी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अस्थिरोग तज्ञ आणि शल्यचिकित्सक डॉक्टर आनंद जोशी आणि आहार तज्ञ डॉक्टर हर्षदा राजाध्यक्ष (मुंबई) यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर मिलिंद हलगेकर यांनी प्रसारमाध्यमांना गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. हिंदवाडी येथील गोगटे महाविद्यालयाच्या वेणुगोपाल सभागृहांमध्ये शनिवारी 1 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4.30 वाजता व्याख्यानांचा कार्यक्रम होणार आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर विराट कोहली आदींवर उपचार आणि चिकित्सा करणारे डॉक्टर अनंत जोशी व डॉक्टर हर्षदा राजाध्यक्ष हे याप्रसंगी बेळगाव परिसरातील क्रीडापटू, प्रशिक्षक व पालकांशी संवाद साधणार आहेत. सदर कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून क्रीडापटू, प्रशिक्षक आणि आणि पालकांनी यांचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. मिलिंद हलगेकर यांनी केले आहे.
पत्रकार परिषदेस डॉ. लक्ष्मीकांत तुक्कार, सचिव डॉ. सुरज जोशी, डॉ. एस. एम. रायकर आदी उपस्थित होते.