बेळगाव विमानतळावर 71 वा प्रजासत्ताक दिन रविवारी उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी 100 फुट उंचीच्या ध्वजस्तंभावर राष्ट्रध्वज फडकविण्यात आला.
बेळगाव विमानतळाच्या टर्मिनल बिल्डिंगच्या आवारामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे बेळगाव विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. आपल्या समयोचित भाषणात संचालक मौर्य यांनी उडान 3 योजनेअंतर्गत बेळगाव विमानतळावरून सुरू झालेल्या विमान सेवांची माहिती देऊन उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी विमानतळावरील अग्निशामक दलातर्फे राष्ट्रध्वजाला खास वॉटर सल्यूट देण्यात आला. त्याचप्रमाणे या वेळी विविध बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.
सदर प्रजासत्ताक दिन कार्यक्रमास ओनररी कॅप्टन यल्लप्पा पाटील, निर्मला पाटील, अतुल शिरोळे, कीर्ती सुरजन, शिल्पा खडकभरी, सुदर्शन आदींसह विमानतळावरील अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एएआय अधिकारी महेंद्र साळवी व सर्वेश सिंग यांनी केले. अखेर आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. बेळगाव विमानतळाच्या उत्कर्षासाठी सहकार्य केल्याबद्दल खासदार आमदार राज्यसभा सदस्य जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन आदींचे यावेळी आभार मानण्यात आले.