सशांची शिकार करणाऱ्या एका टोळीला कित्तूर वनखात्याच्या पथकाने रंगेहात पकडून त्यांच्याकडील दोन मृत ससे आणि शिकारीचे साहित्य जप्त केले.
बसवराज कल्लोळेप्पा वडर (वय 48), गंगाप्पा वस्त्रप्पा कल्लवड्डर (24), हनुमंत दुर्गप्पा कल्लवड्डर (38) व सुनील हनुमंतप्पा मन्नवड्डर (वय 24, सर्व रा. सोमवार पेठ, कित्तूर) अशी वनखात्याने अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या टोळीकडून दोन मृत ससे, शिकारीच्या जाळ्या, लोखंडी सळ्या आदी साहित्य जप्त करण्यात आले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींवर वन्य प्राण्यांची बेकायदेशीर शिकार केल्याप्रकरणी वन्यजीवन संरक्षण कायदा 1971 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कित्तूर वनखात्याचे प्रादेशिक वन संरक्षणाधिकारी (आरएफओ) सिद्धलिंगेश्वर ए. मगदूम यांच्या नेतृत्वाखालील वनखात्याच्या पथकाने गोल्याळी रेंजच्या देगांव बीटमध्ये सदर कारवाई केली. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.