श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी दिलेली गंभीर धमकी आणि होप रिकव्हरी सेंटरला संरक्षण मिळावे यासंदर्भात पिरनवाडी येथील होप रिकव्हरी सेंटरच्यावतीने बुधवारी पोलीस आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले.
पिरनवाडी येथील होप रिकव्हरी सेंटरचे संचालक फादर प्रदीप कुरय्या यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आले निवेदन पोलीस आयुक्त बी. एस. लोकेशकुमार यांनी स्वीकारून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. बेळगावातील ख्रिश्चन समाजाच्या धर्मगुरूंकरवी (फादर्स) होप रिकव्हरी सेंटर हे व्यसनमुक्ती केंद्र चालविले जाते. पूर्वी गणेशपुर येथे आणि आता पिरनवाडीत कार्यरत असणाऱ्या या व्यसनमुक्ती केंद्रातून बरे होऊन जाणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. मादक पदार्थ आणि दारूच्या व्यसनातून मुक्त होणाऱ्या या ठिकाणच्या रुग्णांची संख्या लक्षात घेता या केंद्राचा गेल्या 28 वर्षाचा पूर्वेतिहास अतिशय झळझळीत आहे. कोणत्याही प्रकारचा भाषा अथवा जातीभेद न मानता कायद्याच्या चौकटीमध्ये अत्यंत कडक शिस्तीत होप रेकवरी सेंटरचे कार्य सुरू असते. तथापि येथे उपचारासाठी दाखल झालेल्या संतोष नाईक या रुग्णाने गेल्या 18 जून 2019 रोजी केंद्राच्या आवारात आत्महत्या केली. याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन सखोल चौकशी झाली. त्यानंतर 28 ऑगस्ट 2019 रोजी श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी होप रिकव्हरी सेंटरला भेट देऊन आत्महत्येच्या घटनेचाबाबत तसेच सेंटरच्या कामकाजाबाबत माहिती जाणून घेतली.
आता गेल्या सोमवारी 20 रोजी प्रमोद मुतालिक यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये होप रिकव्हरी सेंटरवर निखालस खोटे आणि बिनबुडाचे नको ते आरोप केले आहेत. तसेच हे सेंटर पेटवून देण्याची धमकी दिली आहे. तेंव्हा याकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी त्याच प्रमाणे होप रिकव्हरी सेंटरला संरक्षण पुरवावे अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.