मराठा मंदिर तर्फे राजमाता जिजाऊसाहेब यांची 422 वी आणि स्वामी विवेकानंद यांची 157 वी जयंती रविवारी साजरी करण्यात आली . या दिनाचे औचित्य साधून राजमाता जिजाऊ साहेबांच्या चरित्राचा अभूतपूर्व साक्षात्कार घडविणारा आणि अंगावर रोमांच उभा करणारा देश-विदेशात गाजलेला एकपात्री बहुरूपी नाट्याविष्कार ‘जिजाऊ’ हा पुण्याच्या सौ सायली गोडबोले -जोशी यांनी सादर केला.
त्यांनी राजमाता जिजाऊसाहेबाचा सखोल अभ्यास केला असून आजवर जिजाऊंचे जीवन चरित्र सादर करणारे 550 हून अधिक प्रयोग सादर केले आहेत .त्यांच्या या एकपात्री नाट्यविष्काराला विक्रमी प्रतिसाद मिळाला . मराठा मंदिरच्यावतीने या खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मराठा मंदिराच्या सभागृह स्त्री-पुरुषांनी खचाखच भरले होते.
या कार्यक्रमापूर्वी प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत मराठा मंदिराचे सेक्रेटरी अप्पासाहेब गुरव यांनी केले तर व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मराठा मंदिराच्या संचालकांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर जिजाऊ यांच्या फोटोचे पूजन आप्पासाहेब गुरव यांनी, स्वामी विवेकानंदांच्या फोटोचे पूजन मराठा मंदिराचे अध्यक्ष शिवाजीराव हंगिर्गेकर यांनी तर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन संस्थेचे खजिनदार लक्ष्मणराव सैनुचे यांनी केले
सौ सायली गोडबोले यांचा परिचय अनंत लाड यांनी करून दिला तर त्यांचा सन्मान अस्मिता गुरव आणि लता खांडेकर यांनी केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रज्योती देसाई यांनी केले आणि आभार प्रदर्शन नेताजी जाधव यांनी केले. कार्यक्रमास अनेक मान्यवर उपस्थित होते .सौ सायली यांनी अतिशय प्रभावीपणे जिजाऊंचे जीवन कार्य प्रेक्षकांसमोर उभे करीत असतानाच छत्रपतींच्या जीवनाचा आढावा घेतला. जिजाऊंच्या जन्मापासून त्यांच्या मृत्यूपर्यंत घडलेल्या घडामोडी त्यांनी श्रोत्यांसमोर जिवंत उभ्या केल्या त्यामुळे मराठा मंदिराने एका चांगल्या उपक्रमाचे आयोजन केले अशी प्रतिक्रिया अनेक उपस्थितांनी व्यक्त केली