पर्यावरण संरक्षणासाठीचा संदेश देण्यासाठी जगातील सर्वाधिक लांब पल्ल्याच्या सायकल प्रवासावर निघालेल्या ‘ग्रीन मॅन’ सायकलिस्ट नरपत सिंग राजपुरोहित यांचे आज मंगळवारी बेळगावात आगमन झाले.
‘ग्रीन मॅन’ सायकलिस्ट नरपतसिंग राजपुरोहित यांनी पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यासाठीच्या आपल्या दीर्घ सायकल प्रवासाला गेल्या 27 जानेवारी 2019 रोजी जम्मु एअरपोर्ट येथून प्रारंभ केला असून जवळपास 24,000 किलोमीटरपेक्षा जास्त अंतराचा प्रवास करण्याचे त्यांचे ध्येय आहे. हे ध्येये पूर्ण झाल्यास नागरिक विशेष करून तरुण पिढीमध्ये पर्यावरण संरक्षण याबाबत सर्वाधिक लांब पल्ल्याच्या सायकल प्रवासाद्वारे जागृती निर्माण करणारे ते देशातील नव्हे तर जगातील पहिले गृहस्थ ठरणार आहेत.
राजस्थान मधील बरमेर जिल्ह्यातील कोजनियोस धानीनजीकच्या पाण्याचे दुर्भिक्ष असणाऱ्या लांगीरा गावचे रहिवासी असणाऱ्या नरपत सिंग यांना लहानपणापासून पाण्याचे महत्त्व कळाले आहे. यासाठी पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यासाठी नरपतसिंग राजपुरोहित घराबाहेर पडले असून आजपर्यंत जम्मू आणि काश्मिर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात, महाराष्ट्र आणि आता कर्नाटकातील बेळगाव असा 15,890 कि. मी. अंतराचा सायकल प्रवास त्यांनी केला आहे आपल्या प्रवासादरम्यान नरपतसिंग यांनी भावी पिढीच्या हितासाठी स्थानिक युवकांना झाडांची रोपे आणि बी बियाणे लावून त्यांचे संवर्धन करण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. स्वतः नरपतसिंग यांनी गेल्या सहा वर्षात 84 हजार 500 पेक्षा अधिक झाडे लावली असून वन्यजीव संरक्षणामध्येही त्यांचे योगदान मोठे आहे.
वन्यजीव संवर्धनासाठी त्यांनी दिवस-रात्र एक केले आहेत. पक्ष्यांना त्याची झळ बसू नये यासाठी नरपत सिंह यांनी सुमारे 2300 पक्षी पाणवठे आणि 50हून अधिक घरटी व खोपे अशी पक्ष्यांची आश्रयस्थाने निर्माण केली आहेत. आज पर्यंत वन्यजीवांचे संरक्षण करताना त्यांनी 133 चिंकारा जातीच्या हरणांना आणि 9 मोरांना जीवदान दिले आहे स्वच्छ हरित आणि आणि भरभराट झालेला भारत देश पाहणे हे आपले स्वप्न असल्याचे नरपतसिंग राजपुरोहित यांनी बेळगाव लाईव्हला सांगितले. याप्रसंगी आशुसिंग थोब इंद्रसिंग झाबरा, दिलीप सिंग, पृथ्वी सिंग, झामादेवी सिंग आदी उपस्थित होते.