मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर बेळगाव येथील एक जवान बेपत्ता झाला असून यासंदर्भात कॅम्प पोलीस स्थानकात फिर्याद नोंदविण्यात आली आहे.
बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर (एमएलआयआरसी) येथे नाईक पदावर सेवा बजावणारा संदीप सुपाड पाटील (वय 32, मुळ रा. घर नं. 72, पोस्ट ऑफिसनजीक कर्देकुर्दे ता. नंदुरबार, महाराष्ट्र) हा जवान बेपत्ता झाला आहे. सध्या नानावाडी बेळगाव येथे वास्तव्यास असणारा संदीप पाटील अचानक बेपत्ता झाल्याने कॅम्प पोलीस स्थानकात फिर्याद नोंदवण्यात आली आहे.
फिर्यादी मध्ये नमूद माहितीनुसार, गेल्या तीन महिन्यापासून संदीप यांनी घरांमध्ये खर्चासाठी पैसे दिले नव्हते. त्यामुळे संदीप आणि त्यांची पत्नी दीपिका यांच्यात मंगळवारी 31 डिसेंबर रोजी रात्री कडाक्याचे भांडण झाले होते. त्यानंतर गुरूवार 2 डिसेंबर रोजी संदीप एमएलआयआरसी मध्ये जाऊन येतो असे सांगून संतापाने आपली दुचाकी (क्र. एमएच 39 के 5914) घेऊन निघून गेले. ते अद्याप परतलेच नसल्याने सर्वत्र शोधाशोध करून अखेर पोलिसात फिर्याद नोंदविण्यात आली.
संदीप पाटील अंगाने सुदृढ असून त्यांची उंची 5 फूट 7 इंच आहे. तसेच त्यांचा चेहरा गोल व वर्ण गव्हाळ आहे. घरातून बाहेर पडताना त्यांनी अंगावर फिकट गुलाबी रंगाचा शर्ट आणि कॉफी रंगाची पॅंट परिधान केली आहे. वरील वर्णनाची व्यक्ती कोणाला आढळल्यास अथवा त्याची माहिती असल्यास संबंधितांनी कॅम्प पोलीस स्थानक क्र.0831-2405234 येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.