कोणतेही राजकारण अथवा भाषा भेद न करता केवळ मराठी साहित्यात काणते नवे बदल घडत आहेत, भाषा व संस्कृती कशी वृद्धिंगत करावी हे समजावे शिवाय नवनवे साहित्य लोकांपर्यंत पोहोचावे या एकमेव उद्देशाने बेळगावसह सीमाभागात आयोजित केल्या जाणाऱ्या मराठी साहित्य संमेलनांवर बंदी घातली जाऊ नये, अशा मागणीचे निवेदन आज मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
माजी महापौर अॅड. नागेश सातेरी, सार्वजनिक वाचनालयाचे माजी नगरसेवक नेताजी जाधव, माय मराठी संघ सांबराचे अध्यक्ष दिलीप चव्हाण, कुद्रेमनी साहित्य संघाचे अध्यक्ष एम. बी. गुरव ,येळ्ळूरचे परशुराम मोटरचे, उचगाव कडोली आदी साहित्य संमेलन आयोजकांच्या नेतृत्वाखाली सीमाभागातील समस्त मराठी भाषिकांच्यावतीने सदर निवेदन सादर करण्यात आले. निवेदन सादर केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना माजी महापौर अॅड. नागेश सातेरी म्हणाले की, बेळगाव जिल्ह्याला मराठी साहित्याची गौरवशाली परंपरा आहे. महाराष्ट्रामध्ये पहिली मराठी कादंबरी लिहिणारे बाबा पदमजी हे बेळगावचेच. बेळगाव शहराने इंदिरा संत, कृ. ब. निकुंब, शंकर रामाणी, अनंत मनोहर यासारखे दिग्गज साहित्यिक दिले आहेत या बेळगाव शहरात तीन वेळा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालेली आहेत. कोणत्याही भाषेचा द्वेष न करता केवळ आणि केवळ मराठी भाषा व संस्कृती संवर्धनासाठी ही साहित्य संमेलने भरवली गेली होती. आज काल बेळगाव ग्रामीण भागात जी मराठी साहित्य संमेलने भरवली जातात त्यांचा उद्देश ही हाच आहे. आमचे स्पष्ट मत आहे की एक भाषा मेली तर एक संस्कृती मरते आणि एक संस्कृती मिली तर एक समाज नष्ट होतो. विविध भाषांचा तुलनात्मक अभ्यास करणारे प्रख्यात भाषातज्ञ गणेश देवी यांनी स्पष्टपणे म्हंटले आहे की आपल्या देशातील ज्या भाषा वापरत नाहीत त्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आम्ही लोक कन्नड भाषेचा दुस्वास करत नाही मराठी आमची आई असेल तर कन्नड आमची मावशी आहे. याच उद्देशाने आम्ही मराठी साहित्य संमेलने भरवतो ही वस्तुस्थिती असताना मराठी साहित्य संमेलन वर बंदी घालणे, महाराष्ट्रातील साहित्यिकांच्या या संमेलनातील सहभागावर आक्षेप घेणे हा जो प्रकार प्रशासनाने चालविला आहे तो चुकीचा आहे असे सातेरी म्हणाले.
महाराष्ट्रात मराठी साहित्यामध्ये नवनवे प्रयोग होत असतात ते प्रयोग काय आहेत हे समजून घेण्यासाठी तसेच भाषा कशी टिकवावी साहित्य कसे वृद्धिंगत करावे हे समस्या समजून घेण्यासाठी आम्ही महाराष्ट्रातील साहित्यिकांना निमंत्रित करत असतो हाच उद्देश ठेवून भविष्यात जी दोन-चार मराठी साहित्य संमेलने होणार आहेत त्यांच्यावर आडमुठेपणा करून बंदी घालू नये, आम्ही भारतीय राज्यघटना पाहतो तेव्हा आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करू नये, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली असल्याचे अॅड. नागेश सातेरी यांनी सांगितले.
माय मराठी संघ सांबराचे अध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी मराठीतील नवनवीन साहित्य लोकांपर्यंत पोहचावे या एकमेव उद्देशाने सीमाभागात मराठी साहित्य संमेलने भरवली जातात असे सांगून गेल्या एक-दोन वर्षांपासून प्रशासनाकडून मराठी साहित्य संमेलनांच्या आयोजनात जी आडकाठी आणली जात आहे ती चुकीची आहे असे सांगितले. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मराठीतच शिकले. कर्नाटकातील दिग्गज साहित्यिकांनी कोणत्याही भाषेचा द्वेष केला नाही हे ध्यानात घेतले पाहिजे. आम्ही कोणतेही राजकारण न करता, जाती अथवा भाषाभेद न करता साहित्य संमेलने भरवत असतो असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.
अलीकडेच कुद्रेमानी मराठी साहित्य संमेलन यशस्वी करणाऱ्या कुद्रेमानी साहित्य संघाचे अध्यक्ष एम. बी. गुरव यांनी आपण कशा पद्धतीने पोलिसांची दडपशाही झुगारून कुद्रेमनी मराठी साहित्य संमेलन यशस्वी केले याची माहिती पत्रकारांना दिली.
सायंकाळी बैठक
जिल्हाधिकारी डॉ एस बी बोंमनहळळी यांनी मराठी भाषिक नेत्यां बरोबर चर्चा करून सायंकाळी 5:30 वाजता मराठी साहित्य संमेलन आयोजका बरोबर चर्चा करू असे आश्वासन दिले आहे त्या नुसार बैठक होणार आहे.