बेळगाव शहरातील मराठा समाजाची मानबिंदू असलेल्या मराठा को. ऑप. बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी पॅनेलने बाजी मारत प्रतिस्पर्ध्यांना पराभवाची धूळ चारली. सत्ताधारी पॅनलचे सर्व उमेदवार या निवडणुकीत बहुमताने विजयी झाले.
या निवडणुकीत माजी नगरसेवक मोहन बेळगुंदकर,दत्ता नाकाडी आणि पुंडलिक कदम पाटील या मार्केट यार्डमधील तीन अडत व्यापाऱ्यांनी सत्ताधारी पॅनेल विरोधात आव्हान उभे केले होते, मात्र त्यांना अपयश आले. गेल्या आठवडाभरापासून सत्ताधारी पॅनेलला या तीन व्यापाऱ्यांनी कडवी टक्कर देण्याचा प्रयत्न केला होता विषेश करून मोहन बेळगुंदकर यांनी आपली मोठी ताकद लावली होती.
रविवारी सकाळी 9 वाजता निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरू झाली ती सायंकाळी 4 वाजता समाप्त झाली. यावेळेत एकूण 1637 पैकी 1183 सभासदांनी
(70.72%) मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी 6 वाजता मतमोजणी पूर्ण झाली व निकाल जाहीर करण्यात आला. निकाल जाहीर होताच सत्ताधारी पॅनेलच्या समर्थकांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोषी आनंदोत्सव साजरा केला. सदर निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून सहकार खात्याचे अधिकारी मंजुनाथ यांनी काम पाहिले.
निवडणुकीत सत्ताधारी पॅनेलच्या विजयी उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे आहेत. दिगंबर पवार (856 मते), बाळाराम पाटील (847), दीपक दळवी (839), मोहन चौगुले (832),
विनोद हांगीरगेकर (817), शेखर हंडे (749), बाळासाहेब काकतकर (745), लक्ष्मण होनगेकर (742), बी. एस. पाटील (725 मते).
सदर निवडणुकीमध्ये प्रतिस्पर्धी
पुंडलिक कदम पाटील (292 मते),दत्ता नाकाडी (303) आणि मोहन बेळगुंदकर (293 मते) यांना शर्तीचे प्रयत्न करून देखील अखेर पराभव स्वीकारावा लागला.
दरम्यान सुनील अष्टेकर, रेणू किल्लेकर, नीना काकतकर, शिवबाळ कोकाटे आणि लक्ष्मण नाईक या पांच जणांची यापूर्वीच मराठा बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे.