स्त्रियांकडून मासिक पाळीच्या वेळी वापरल्या जाणाऱ्या सॅनिटरी नॅपकिन्सची विल्हेवाट कशी लावावी हा मोठा प्रश्न आहे. त्यावर उपाय म्हणून पंख संस्थेच्या गौरी मांजरेकर यांनी पुनर्वापर करता येतील असे नॅपकिन्स तयार केले असून त्या संदर्भातील जनजागृती मोहीम त्यांनी हाती घेतली आहे.
यासंदर्भात ज्योतीनगर गणेशपूर येथे त्यांनी नुकताच जागृतीपर कार्यक्रम केला. गौरी मांजरेकर यांना इंडियन वुमन एक्स लन्सी अँड लीडरशिप अवॉर्ड 2019 हा पुरस्कार मिळाला आहे. बिगर सरकारी संस्था (एनजीओ) आणि ग्रामीण उद्योजगता या क्षेत्रातील मंडळींना हा पुरस्कार दिला जातो.
स्त्रियांची मासिक पाळी आणि स्वच्छता यासंदर्भात तळागाळातील महिलांमध्ये जागृती निर्माण करणाऱ्या गौरी मांजरेकर यांनी मासिक पाळी दरम्यान पुनर्वापर करता येतील असे माफक दरातील नॅपकिन्स तयार केले आहेत. गौरी मांजरेकर यांनी ज्योतीनगर गणेशपूर येथील कार्यक्रमात महिलांमध्ये जागृती निर्माण करताना मासिकपाळीच्या दिवसांमध्ये घ्यावयाची काळजी आणि स्वच्छता याबाबत मार्गदर्शन केले.
आपण तयार केलेल्या पर्यावरण पूरक आणि पुनर्वापर करण्यायोग्य बनविलेल्या सॅनिटरी नॅपकिन्सची किंमत प्रति नग 125 ते 150 रुपये इतकी असल्याचे गौरी मांजरेकर यांनी ज्योतीनगर येथील कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
अभिनेता अक्षय कुमार याच्या पॅड मॅन या चित्रपटात नंतर महिलांची समस्या प्रकाश झोतात आली होती या चित्रपटा नंतर देशात अनेक ठिकाणी पॅडमॅन तयार झाले आहेत गौरी मांजरेकर या देखील आपल्या कर्तृत्ववाने बेळगावच्या पॅड वुमन बनल्या आहेत.