पाणी वाचवा आणि पाणी जिरवा हा नारा जसा ग्रामीण भागात सुरू आहे तसाच शहरातही राबवण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. मात्र मनपाच्या आंधळ्या कारभारामुळे पाणी सोडा आणि ते वाया घालवा असाच नारा देण्यात येत असल्याचे सध्या तरी शहर आणि परिसरात दिसून येत आहे. ठीक ठिकाणी पाणी गळती यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात असताना याकडे मात्र महानगरपालिकेने साफ दुर्लक्ष करून भविष्यात येणाऱ्या धोका अधिक लवकर कसा येईल याकडे लक्ष दिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत असून यापुढे तरी महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या गळत्यांना वेळीच दुरुस्ती करून सोय करावी अशी मागणी होत आहे.
नुकतीच बेळगाव येथील डाक बंगल्याजवळ पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. शनिवारी सायंकाळी साडेचार ते पाचच्या दरम्यान ही पाईपलाईन फुटली होती. सुमारे गल्लीभर पाणी वाया गेले मात्र याचे सोयरसूतक महानगरपालिकेला दिसून आले नाही. त्यानंतर काही अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ही गळती बंद करण्याचे आव्हान केले. त्यानंतर मनपा प्रशासनाला जाग आली आणि गळती थांबविण्यात आली.
पुन्हा मंडोळी रोड येते गळती लागली आहे. मंडोळी रोड येथील मुन हॉस्पिटल जवळ ही गळती लागली असून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. त्यामुळे येथील नागरिकातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. ही गळती तातडीने थांबवावी अशी मागणी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली. मात्र त्यांनी याकडे साफ दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. त्यानंतर काही तासानंतर मनपा प्रशासनाने ही गळती थांबविण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र अजूनही ती गळती योग्यरीत्या दुरुस्ती न केल्याने पुन्हा समस्या उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांनी या मनपा प्रशासनाच्या नावे बोंब ठोकण्यास सुरूवात केल्याचे दिसून येत आहे.
ज्याप्रमाणे उद्यानात कारंजी सोडण्यात येतात त्याचप्रमाणे मंडोळी रोडवरही पाईप फुटून कारंजे उडत होते. या परिसरात तलाव सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. इतके पाणी वाया जाऊन देखील मनपा प्रशासनाने झोपेचे सोंग घेतले आहे का? असा सवाल उपस्थित करण्यात येत होता. त्यामुळे यापुढे तरी अशा प्रकारावर आळा घालून अशी घटना घडू नये याकडे मनपा प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे. हा सारा प्रकार म्हणजे शहरात पाण्याच्या पिचकाऱ्या आणि मनपा डुलकाऱ्या मारत असल्याचे बोलले जात आहे.