पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘फिट इंडिया विक्’ अंतर्गत गणेशपुर रोड येथील गुड शेफर्ड सेंट्रल स्कूलतर्फे येत्या शनिवार दि. 4 जानेवारी 2020 रोजी फिट इंडिया 5 कि.मी. अंतराची मॅरेथॉन शर्यत आयोजित करण्यात आली आहे.
गुड शेफर्ड सेंट्रल स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती सरला कोसाराजू यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या शनिवारी सकाळी 7 वाजता गणेशपुर रोड येथील गुड शेफर्ड सेंट्रल स्कूलच्या आवारातून फिट इंडिया 5 कि. मी. मॅरेथॉन शर्यतीचा प्रारंभ होईल. रामघाट रोड मार्गे शौर्य सर्कल, क्लब रोड, हर्षा इलेक्ट्रॉनिक्स वळण, गोल्फ क्लब आणि परत शौर्य सर्कलमार्गे गुड शेफर्ड स्कूल असा या शर्यतीचा मार्ग असणार आहे. तंदुरुस्त आरोग्याचे महत्त्व माहीत असलेल्या सर्वांसाठी ही मॅरेथॉन शर्यत खुली आहे.
नागरिकांनी आपल्या सर्वसामान्य जीवनात आणि दैनंदिन कार्यक्रमांमध्ये व्यायाम खेळाचा अंतर्भाव करावा यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने माननीय पंतप्रधानांनी गेल्या 29 ऑगस्ट रोजी देशभरात फिट इंडिया मुहमेंट अर्थात तंदुरुस्त भारत अभियान सुरू केले. याचाच एक भाग म्हणून गुड शेफर्ड स्कूलतर्फे या फीट इंडिया 5 किमी मॅरेथॉन शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थी पालक शिक्षक आणि समस्त जनतेला तंदुरुस्त आरोग्याचे महत्त्व पटवून देण्याच्या मुख्य उद्देशाने भारत सरकारच्या युवजन सेवा मंत्रालयाच्या मान्यतेने या शर्यतीचे आयोजन करण्यात आले असल्याचे मुख्याध्यापिका सरला कोसाराजू यांनी स्पष्ट केले.
सदर फिट इंडिया 5 कि. मी. मॅरेथॉन शर्यतीचे उद्घाटन उप पोलीस आयुक्त यशोदा वंटगुडी यांच्या हस्ते ध्वज दाखवून होणार आहे. याप्रसंगी एसबीजी ग्रुप ऑफ इंस्टिट्यूशन्सच्या व्यवस्थापकीय संचालिका प्रेरणा घाटगे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या मॅरेथॉन शर्यतीतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे तर दिली जाणारच आहे, शिवाय शर्यतीत भाग घेणाऱ्या प्रत्येक धावपटूला टी-शर्ट आणि प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.