कणबर्गी येथील तलावाच्या दोन्ही बाजूला जनावरांना ये जा करण्यासाठी रस्ता सोडण्यात यावा अन्यथा कणबर्गी येथील सर्व जनावरे बुडा कार्यालय आवारात आणून सोडले जातील असा इशारा कणबर्गी येथील शेतकऱ्यांनी दिला असून यासंदर्भात आज शुक्रवारी निवेदन सादर करण्यात आले.
कणबर्गी येथील युवा नेते व शेतकरी किसन सुंठकर यांच्या नेतृत्वाखाली आज शुक्रवारी सादर करण्यात आलेले निवेदन बुडाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी स्वीकारून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. सध्या स्मार्ट सिटी अंतर्गत विविध विकास कामे राबविण्यात येत आहेत. कणबर्गी येथे देखील जी विकास कामे राबविण्यात येत आहेत, त्यांना आमचा विरोध नाही. परंतु कणबर्गी तलावाच्या दोन्ही बाजूला जनावरांसाठी रस्त्याची जागा मोकळी सोडावी. गेल्या दोन वर्षापासून आम्ही ही मागणी करत आहोत परंतु अद्याप त्याची पूर्तता झालेली नाही. कणबर्गी गावात सुमारे दोन हजारहून अधिक पाळीव जनावरे आहेत यामध्ये बकऱ्यांची संख्या अंदाजे 2 हजार आहे. या जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आणि जनावरे धुण्यासाठी कणबर्गी तलावाचा वापर केला जातो. या परिसरात अन्य दोन तीन तलाव आहेत, परंतु पावसाळा वगळता अन्य मोसमात ते कोरडे ठणठणीत असतात. त्यामुळे कणबर्गी येथील शेतकऱ्यांना जनावरांसाठी कणबर्गी तलावावर अवलंबून राहावे लागते.
सध्या स्मार्ट सिटी अंतर्गत या परिसरात विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. ही विकास कामे करताना कणबर्गी तलावाच्या दोन्ही बाजूला रस्त्यासाठी किमान 30 फूट जागा सोडावी, जेणेकरून या रस्त्यावरून जनावरांना तलावाकडे नेता येईल. कणबर्गी येथील जनावरे या तलावातील पाणी पितात तसेच तलावातून पोहून दुसऱ्या बाजूला असणाऱ्या रस्त्याने गावाकडे जातात. तेंव्हा जर या तलावाच्या चोहोबाजूने विकास कामे केल्यास जनावरांना ये – जा करण्यासाठी रस्ता शिल्लक राहणार नाही. आणि त्यांना या तलावापासून वंचित राहावे लागेल. यासाठी तलावाच्या दोन्ही बाजुला रस्त्यासाठी जागा सोडावी. या मागणीची त्वरित पूर्तता केली जावी अन्यथा सर्व जनावरे आणून बुडा कार्यालय आवारात सोडण्यात येतील, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
आपल्या मागणीसंदर्भात किसन सुंठणकर यांनी बेळगाव लाईव्ह ला अधिक माहिती दिली. बुडा कार्यालय येथे निवेदन सादर करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांनी स्वतः सोबत आपली जनावरे देखील आणली होती. बुडा कार्यालय आवारात उभ्या असलेल्या शेतकऱ्यांच्या जनावरांच्या जोड्या सार्यांचे लक्ष वेधून घेत होत्या. उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी आणि प्रांताधिकारी यांनाही सादर करण्यात आले. याप्रसंगी कणबर्गी येथील बरेच शेतकरी उपस्थित होते.