बेळगाव शहरात रात्री उशिरा पर्यन्त दुकानातून मटण विक्री होत होती मात्र आगामी 1 फेब्रुवारी पासून केवळ सायंकाळी सहा पर्यंत मटण मिळणार आहे.
एकीकडे कांदा आणि टॉमेटोच्या भाववाढीची झळ तर दुसरीकडे मिरच्यांचे दर ही गगनाला मिळाले असताना मटणप्रेमींना या वर्षाची सुरुवात तरी चांगला जाईल अशी आशा होती. मात्र नवीन वर्ष सुरू होऊन महिना होत आला तरी मटणाचे दर वाढत असतानाच बेळगाव शहरातील मटणाची दुकाने 1 फेब्रुवारीपासून सायंकाळी 6 पर्यंतच खुली ठेवण्याचा निर्णय बेळगाव शहर मटण शॉप असोसिएशन ने घेतला आहे.
एकीकडे मटण दरवाढ तर दुसरीकडे सायंकाळी 6 नंतर मटणप्रेमींना मटण खायची चट लागल्यास किंव्हा अचानक मटणप्रेमी पाहुणे घरी आल्यास त्यांच्या आशा धुळीस मिळण्याची शक्यता आहे. सध्या बेळगाव शहरातील मटण दर चरबीसह 540 रुपये प्रति किलो चरबीविना 600 रुपये प्रति किलो असा आकारण्यात येत आहे.
सर्वसाधारण मटणप्रेमी बेळगावकर सायंकाळ 6 पर्यंत मटणाची खरेदी करतो. त्यानंतर सायंकाळी 6 नंतर दुकाने सुरु ठेवणे गरजेचे नसते. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत दुकाने सुरु ठेवण्याची गरज नसल्याची माहिती असोसिएशन ने दिली.
महाराष्ट्रापेक्षा बकऱ्यांना गोवा, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगाणामध्ये भाव जास्त मिळतो. बेळगाव जिल्ह्यातील बकरी मंडईत आंध्र आणि तेलंगाणाचे व्यापारी येऊन बकरी खरेदी करत आहेत त्यामुळं मटण कमी पडत असून दर देखील वाढला आहे.राजस्थान आणि मध्यप्रदेश या दोन राज्यात दरवर्षी बकऱ्यांचं सर्वाधिक उत्पादन होतं. मात्र अवकाळी पावसामुळे अनेक बकऱ्यांचा मृत्यू झाला. काही ठिकाणी अपुऱ्या खाद्यामुळे बकऱ्या वजनात भरू शकल्या नाहीत. यामुळे मटणविक्रीवर त्याचा परिणाम झाला होता.