शहर आणि परिसरात कुत्र्यांचा उच्छाद सुरू असला तरी ग्रामीण भाग याला अपवाद नाही. हिंडलगा येथे कुत्र्यांच्या हल्ल्यात एका रेडकाच्या मृत्यू झाला आहे तर दोन म्हशी गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून ग्रामपंचायतीने कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे.
सोमवारी रात्री सुळगा- हिंडलगा येथे शेतकरी मल्लाप्पा परशराम पाटील यांचे सुमारे 14 जनावरे आहेत. त्यामध्ये काही जनावरे गोठ्यात बांधण्यात आली होती तर काही बाहेर बांधण्यात आली होती. रात्री अचानक कुत्र्याने या जनावरांवर हल्ला केला. यामध्ये एका रेडका चा मृत्यू झाला आहे तर दोन म्हशी गंभीर जखमी झाले आहेत. कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
सुमारे 70 ते 80 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. पाटील यांचे शिवारा जवळ घर असल्याने दुग्ध व्यवसायासाठी 14 जनावरे पाळली आहेत. त्यामध्ये रेडकांचाही समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या घराजवळ जनावरांसाठी गोठा दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे त्यांनी सोमवारी रात्री आपल्या काही म्हशी बाहेर बांधल्या होत्या. सर्वजण झोपी गेल्यानंतर दहा ते बारा कुत्र्यांच्या टोळक्याने जनावरांवर हल्ला केला आहे. यामध्ये एका रेडकाचा हकनाक बळी गेला आहे.
गंभीर झालेल्या म्हशींमध्ये एका म्हशीची प्रकृती चिंताजनक आहे. त्या म्हशीला वैद्यकीय उपचारासाठी पशुवैद्य दवाखान्यात हलविण्यात आले आहे. या घटनेत पाटील कुटुंबीयांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. तुरमुरी व सुलगा परिसरात मोकाट कुत्र्यांचे प्रमाण वाढले आहे. यापूर्वीही म्हशी व दोन बकऱ्यांचा फडशा पडला होता. आता तशीच घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.