देवगिरी ते बंबरगा रस्त्याची सध्या पुरता वाताहत झाली आहे. यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणे धोकादायक बनले आहे. रस्त्यात मोठमोठे खड्डे आणि विखुरलेली खडी यामुळे अपघातात वाढ होत असून हा रस्ता नेमका होणार तरी कधी असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
बंबरगा गावात प्रवेश करताना मोठमोठे खड्डे पडल्याने मोठी अडचण होत आहे. या खड्ड्यांमध्ये पाणी साचून अनेकांच्या अंगावर चिखल उडण्याचे प्रकारही घडत आहेत. त्यामुळे हा रस्ता करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने प्रयत्न करावे अशी मागणी होत आहे.
देवगिरी ते बंबरगा किमान चार किलोमीटरचा रस्ता आहे. मात्र मागील कित्येक वर्षांपासून या रस्त्याकडे सार्यांचेच दुर्लक्ष झाले आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खड्डे पडल्याने अपघातांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
पाच ते सहा वर्षांपूर्वी हा रस्ता करण्यात आला होता. मात्र या रस्त्यावरून अवजड वाहतूक होत असल्याने याच बरोबर पवन चक्की बसविण्यासाठी या रस्त्याचा वापर झाल्याने हा रस्ता पुरता खचला आहे. मात्र याचा कोणालाच परिणाम जाणवला नाही. तसे पाहता पवनचक्की कंत्राटदाराने या रस्त्याची डागडुजी करण्याची गरज निर्माण झाली होती. मात्र आजतागायत हा रस्ता करण्यात आला नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.