बेळगाव जिल्ह्यातील सहकारी पतसंस्था आणि बँकांच्या निवडणुकांची प्रक्रिया येत्या शनिवारपासून होणार आहे .बेळगाव शहरातील नामवंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठा बँक ,तुकाराम बँक, पायोनियर अर्बन बँक, बसवेश्वर बँक याचबरोबरीने इतर महत्त्वाच्या सहकारी संस्थांमध्ये निवडणुका होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान सगळीकडेच सत्ताधारी पॅनल बलाढ्य असल्यामुळे या निवडणुका समझोत्याच्या होणार की अटीतटीच्या हा प्रश्न आहे .
सहकारी बँकांच्या माध्यमातून आपल्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात करण्याची इच्छा अनेकांमध्ये असते. यामुळे अ दर्जाचे समभाग असलेल्या व्यक्ती या निवडणुकीत सहभागी होतात. मात्र या वर्षी नियम कडक करण्यात आला आहे. निवडणुकीत सहभागी होऊ इच्छिणार्यांना वार्षिक सर्वसाधारण बैठकीची हजेरी आणि संबंधित संस्थेत डिपॉझिट असण्याची गरज, असा नियम आहे. या नियमाची अंमलबजावणी झाल्यास बहुतांश सहकारी बँका आणि सोसायट्यांमध्ये सध्या संचालक असणाऱ्या व्यक्तींना ही निवडणुकीत भाग घेता येईल की नाही ?असा प्रश्न असून मतदान करण्याच्या बाबतीतही अनेक वेगवेगळे नियम आले आहेत. त्यामुळे या वेळच्या निवडणुकांची चर्चा सगळीकडे सुरू आहे.
बँकांच्या कार्यकारणी मंडळांनी समजुतीतून निर्णय घेऊन निर्णय घेतल्यास फायदा होऊ शकणार आहे. बेळगाव शहरातील बँका आणि सहकारी पतसंस्थांची निवडणुकीची चर्चा जोरात असून या निवडणुका लागल्यानंतर वातावरणात नक्कीच बदल होणार आहे.