राज्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचा आज बुधवारी एक दिवसाचा बेळगाव दौरा यशस्वी झाला असला तरी वाहनचालकांना मात्र वाहतूक प्रवेश बंदीचा त्रास सोसावा लागला.
मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा आज बुधवारी बेळगाव दौऱ्यावर आले होते मुख्यमंत्र्यांना झेड प्लस सुरक्षा व्यवस्था असल्याने त्यांच्या प्रवास मार्गावरून इतर वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली होती त्यासाठी मार्गात बदल करण्यात आले होते. याची कल्पना नसल्यामुळे नेहमीप्रमाणे संबंधित रस्त्यावरून जाणाऱ्या बहुतांश वाहनचालकांना अर्ध्या वरून मागे फिरावे लागत होते किंवा अन्य मार्गाने आपल्या इच्छित स्थळी जावे लागत होते. मुख्यमंत्र्यांच्या मार्गावरील प्रवेश बंदीमुळे काही ठिकाणी वाहतुकीची कोंडी ही झाली होती.
बेळगावातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा जाणार असल्यामुळे आज बुधवारी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत निसर्ग धाबा, केपीटीसीएल हॉल, केएलई रोड, कोल्हापूर सर्कल, वाय जंक्शन, लक्ष्मी कॉम्प्लेक्स सदाशिवनगर बँक ऑफ महाराष्ट्र, स्मार्ट सिटी कमांड अँड कंट्रोल सेंटर पर्यंतच्या मार्गावर अन्य वाहनांसाठी प्रवेश बंदी लागू करण्यात आली होती. परिणामी अनेक वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागल्याने तर काहीजणांना इच्छित स्थळी जाण्यासाठी मोठा भोवाडा घालावा लागल्याने त्यांच्यात नाराजी व्यक्त होताना दिसत होती.