कर्नाटक संघाच्या किशन बेदरे याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर कर्नाटक संघाने आज मंगळवारी बेळगावातील केएससीए स्टेडियमवर सुरू असलेल्या कर्नल सी. के. नायडू क्रिकेट स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी आंध्रप्रदेश संघाची त्यांच्या दुसऱ्या डावात दिवस अखेर 7 बाद 174 धावा अशी अवस्था केली.
दरम्यान तत्पूर्वी आज कर्नाटक संघाचा पहिला डाव 98.4 षटकात सर्वबाद 268 धावा असा संपुष्टात आला होता. आंध्रप्रदेश संघाच्या पहिल्या डावातील 281 धावांना प्रत्युत्तर देताना अंकित उडुपा (40 धावा), संजय सातेरी (69 धावा) आणि व्ही. व्याशक (60 धावा) यांच्या फलंदाजीच्या जोरावर कर्नाटक संघाने पहिल्या डावात सर्वबाद 268 धावा काढल्या. त्यानंतर फलंदाजीस उतरलेल्या आंध्रप्रदेश संघाने आपल्या दुसऱ्या डावात दिवस अखेर 7 बाद 174 धावांचा टप्पा गाठला.
पहिल्या डावात ए. प्रणयकुमार (62 धावात 3 गडी), गिरिनाथ रेड्डी (47 धावात 3 गडी) आणि पी. पी. मनोहर (39 धावांत 3 गडी) हे आंध्रप्रदेश संघातर्फे सर्वात यशस्वी गोलंदाज ठरले. या तिघांना विनू विनुकोंडा याने 34 धावात 1 गडी बाद करून चांगली साथ दिली.
आंध्रप्रदेश संघाचा दुसरा डाव अडखळत सुरू झाला. धावा फलकावर 35 धावा असतानाच त्यांचे आघाडीचे तीन फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. मात्र गिरीनाथ रेड्डी (नाबाद 43 धावा), यारा संदीप (39 धावा) आणि साई वर्धन (33 धावा) यांच्या फलंदाजीमुळे मंगळवारी तिसऱ्या दिवसाअखेर आंध्रप्रदेश संघाला आपल्या दुसऱ्या डावात 74 षटकांत 7 बाद 174 धावांपर्यंत मजल मारता आली. त्यांचे वीणू विनुकोंडा आणि प्रणयकुमार हे फलंदाज अद्याप बाकी आहेत.
कर्नाटक संघातर्फे किशन बेदरे याने भेदक गोलंदाजी करत आंध्र प्रदेश संघाचा निम्मा संघ गारद केला. किशनने आपली 18 पैकी पाच षटके निर्धाव टाकून 47 धावांच्या मोबदल्यात आंध्रचे पाच फलंदाज बाद केले. त्याला अभिलाष शेट्टी (37/1) आणि व्ही. व्याशक (25/1) यांनी चांगली साथ दिली.