बेळगाव ग्रामीण भागात सध्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून येळ्ळूर श्री चांगळेश्वरी देवी मंदिर आणि धामणे येथील मंदिरात चोरी करून चोरट्यांनी लाखो रुपये किंमतीचे दागिने लंपास केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. चोरीच्या या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
ग्रामीण भागात धुमाकूळ घालणाऱ्या चोरट्यांनी सोमवारी मध्यरात्री येळ्ळूर आणि धामणे येथील मंदिरांना टार्गेट केल्याचे दिसून आले. येळ्ळूर येथील श्री चांगळेश्वरी देवी मंदिरात चोरी करून चोरट्यांनी देवीच्या गळ्यातील दोन सोन्याची 10 ग्रॅम ची मंगलसूत्र ,8 हजारचा चांदीचा छल्ला, 3 ग्राम सोन्याचा नथ,बोरमाळ व अन्य किंमती ऐवज लंपास केला. सोमवारी मध्यरात्री चोरट्यांनी श्री चांगळेश्वरी मंदिरात कोणीही नसल्याची संधी साधून मंदिराच्या प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून गाभाऱ्यात प्रवेश केला, त्यानंतर देवीच्या अंगावरील दागिने त्यांनी लंपास केले. आज मंगळवारी देवीचा वार असल्यामुळे पुजाऱ्यांनी सकाळी 6 वाजता मंदिर उघडले. त्यावेळी सदर चोरीचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. हा प्रकार त्यांनी गावातील पंच मंडळी व प्रतिष्ठित नागरिकांच्या निदर्शनास आणून देऊन पोलिसांना घटनेची माहिती दिली. देवीच्या मंदिरातील चोरीची बातमी मंगळवारी सकाळी येळ्ळूर गावात वार्यासारखी पसरली आणि घटनास्थळी नागरिकांनी एकच गर्दी केली. नागरिक गटागटाने मंदिरातील चोरीच्या घटनेबाबत तर्कवितर्क लढविताना दिसत होते.
दरम्यान, येळ्ळूर प्रमाणेच नजीकच्या धामणे गावातील श्री बसवेश्वर मंदिरामध्ये देखील चोरट्यांनी डल्ला मारला. सोमवारी मध्यरात्री चोरट्यांनी या मंदिरातील सुमारे 2 किलो चांदीचे दागिने लंपास केले. या ठिकाणीदेखील मंगळवारी सकाळी चोरीचा हा प्रकार पुजारी आणि गावकऱ्यांच्या लक्षात आला. मंदिरांमधील किमती ऐवज चोरीच्या या दोन्ही घटनांची नोंद बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात झाली असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.
दरम्यान चोरीच्या या घटनांमुळे येळ्ळूर व धामणे सह आसपासच्या गावातील भाविकांमध्ये खळबळ उडाली आहे त्याचप्रमाणे चोरट्यांना त्वरित गजाआड करण्याची जोरदार मागणी केली जात आहे.