प्रवाशांना कोणतीही पूर्वसूचना न देता बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकातील नियंत्रण व तिकीट आरक्षण कक्ष पुन्हा एकदा स्थलांतरित करण्यात आल्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडाल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.
बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकावरील जुने प्लॅटफॉर्म काढण्याचे काम हाती घेतल्यानंतर नियंत्रण व तिकीट आरक्षण कक्षांचे स्थलांतर करण्यात आले होते. बस स्थानकावरील सर्व जुनी प्लॅटफॉर्म यापूर्वीच पाडण्यात आले आहेत. त्यामुळे केवळ रस्ताकडेला लागून असलेल्या शिल्लक असलेल्या एकमेव प्लॅटफॉर्मवर बस चौकशी केंद्र, बसपास वितरण, तिकीट आरक्षण आणि इतर परिवहन सेवांशी संबंधित कक्षांची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली होती.
आता मध्यवर्ती बस स्थानकाचे काम अंतिम टप्प्यात आले असल्यामुळे तो एकमेव प्लॅटफॉर्म देखील काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. प्लॅटफॉर्म पाडण्यासाठी छतावरील पत्रे ही काढण्यात आले होते. मात्र अचानक हे काम अर्ध्यावर सोडण्यात आले आहे.
दरम्यान, मध्यवर्ती बस स्थानकावर सौंदती यात्रेसाठी निर्माण केलेल्या विशेष पिकअप पॉईंटच्या ठिकाणी या कक्षांची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली होती. मात्र तेथून पुन्हा कार्यालयाचे स्थलांतर जुन्या प्लॅटफॉर्म मध्ये करण्यात आले आहे. प्रवाशांना पूर्वकल्पना न देताच परिवहन मंडळाकडून अशाप्रकारे दोन वेळा या कक्षाचे स्थलांतर झाल्याने प्रवाशांचा गोंधळ उडाला आहे. प्रवाशांना चौकशीसाठी तसेच तिकीट आरक्षणासाठी पुन्हा एकदा धावाधाव करावी लागत असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. तसेच यापुढे बसस्थानकावरील काही बदल करावयाचा असेल तर त्याची पूर्वसूचना प्रवाशांना दिली जावी अथवा प्रवेशद्वारावर तशा प्रकारचा माहिती फलक उभारला जावा, अशी मागणी केली जात आहे.