मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी केंद्रीय राज्य रेल्वेमंत्री सुरेश अंगडी आणि रेल्वे खात्याच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी गेल्या नोव्हेंबर 2019 मध्ये झालेल्या बैठकीत बेळगाव ते धारवाड या नियोजित नूतन रेल्वेमार्गाला तत्वतः मान्यता दिली आहे.
कित्तूर मार्गे बेळगाव ते धारवाड पर्यंत बनविण्यात येणाऱ्या नव्या रेल्वेमार्गासाठी सदर बैठकीत आपली तत्वतः मान्यता असल्याचे सांगताना मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी या रेल्वेमार्गासाठी राज्य शासन विनामोबदला जमीन उपलब्ध करून देईल तसेच रेल्वे मार्गाच्या उभारणीत रेल्वे खात्याला सहकार्य करेल असे आश्वासन दिले आहे. सध्या असलेला बेळगाव ते धारवाड हा रेल्वे मार्ग लोंढा स्टेशनवरून जातो त्यामुळे रस्ते मार्गापेक्षा हे अंतर जास्त होते.
रेल्वेने बेळगाव होऊन धारवाडला पोहोचायला खूप वेळ लागतो. यासाठी कित्तूर मार्गे बेळगावहून धारवाडला थेट नवा रेल्वेमार्ग बांधण्यात यावा, अशी या भागातील लोकप्रतिनिधी आणि जनतेची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी आहे. सदर मागणीची पूर्तता करण्यासाठी अलीकडेच धारवाड – कित्तूर – बेळगाव या नियोजित रेल्वे मार्गाच्या जमिनीचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. सदर नियोजित रेल्वे मार्ग धारवाड ,कित्तूर आणि हिरेबागेवाडी येथून बेळगावला जोडला जाईल. ज्यामुळे बेळगाव आणि धारवाड यांच्यामध्ये पूर्वीच्या तुलनेत 31 किलोमीटर अंतर कमी होणार आहे. नियोजित रेल्वेमार्गासाठी 998 कोटी रुपये इतका खर्च येणार असून आगामी 2020- 21 च्या अर्थसंकल्पात त्याचा समावेश होण्याची शक्यता आहे.
या रेल्वे मार्ग प्रकल्पाचा सविस्तर अहवाल रेल्वे खात्याकडे सुपूर्द करण्यात आला असून त्याला अंतिम मंजुरी मिळावयाची आहे. या नियोजित 998 कोटी रुपये खर्चाच्या रेल्वे मार्गा दरम्यान 11 रेल्वे स्टेशन्स आणि सुमारे 140 ब्रिज असतील. कर्नाटक रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनी (के- आरएआयडी) यांनी अलीकडेच म्हणजे गेल्या ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये या रेल्वेमार्गातचे बृहत सर्वेक्षण केले होते.
त्यानुसार बेळगाव ते धारवाड हा रेल्वे मार्ग 90 किलोमीटरचा असणार असून या मार्गावर धारवाडसह कराकोप्पा, कित्तूर, बागेवाडी, एम. के. हुबळी, के.के. सोप्प, येळ्ळूर आणि बेळगाव ही प्रमुख रेल्वेस्थानक लागणार आहेत. सध्या या नियोजित रेल्वे मार्गाला लवकरात लवकर मंजुरी मिळवून कामाला सुरुवात व्हावी यासाठी केंद्रीय राज्य रेल्वेमंत्री सुरेश अंगडी प्रयत्नशील आहेत.