मागील चार ते पाच वर्षापासून बेळगाव शहर आणि उपनगरात भूमिगत वीजवाहिन्या घालण्याचे काम जोरदार सुरू असले तरी या भूमिगत वीजवाहिन्याचे काम अजूनही अर्धवट स्थितीत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. मागील काही दिवसापासून नागरिकांना वेठीस धरून या वीज वहिनींचे काम सुरू करण्यात आले. काही ठिकाणी या योजनेचे काम अंतिम टप्प्यात असले तरी अजूनही बऱ्याच ठिकाणी वीज वाहिन्या घालण्याचे काम अर्धवट असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
नको त्या ठिकाणी खोदाई करून वीजवाहिन्या घालण्याचे काम करण्यात आले. मात्र ते योग्यरीत्या झाले नसल्याने पुन्हा येरे माझ्या मागल्या अशीच अवस्था झाली आहे. भूमिगत वीज वाहिनीचे काम संबंधित कंपनीने अर्धवट ठेवल्याने निकृष्ट दर्जाचे ही झाल्याने नागरिकांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामुळे संबंधित कंपनीने हे काम पूर्ण करून नागरिकांची सोय करावी अशी मागणी होत आहे.
शहरातील विविध भागात वीज महिन्यांचे काम पूर्ण झाले आहे. मात्र ते अजूनही सुरु नसल्याने नेमका तारांचा जंजाळ कधी संपणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. भूमिगत वीजवाहिन्या घालण्याचे काम मोठ्या हौसेने हाती घेण्यात आले असले तरी ते पूर्ण करण्याकडे मात्र साफ दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे यापुढे तरी याचा विचार करून तातडीने हे काम पूर्ण करावे अशी मागणी होत आहे.
भूमिगत वायरिंगचा रखडलेल्या कामावर अनेक बैठकीत चर्चाही झाली आहे. शहरातील रस्ते विकासाचा निधी परत जाण्याची भीती व्यक्त होत आहे. यावर नियंत्रण नगरपालिकेकडे नसल्याने संबंधित ठेकेदार कंपनीवर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली असताना याकडे साफ दुर्लक्ष करून नागरिकांची हेळसांड करण्यात धन्यता मानू लागले आहेत. त्यामुळे भूमिगत वीज वाहिनी नेमके कधी सुरू होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.